दोडामार्ग : येथील बाजारपेठेत नगरपंचायत परनानगी पावती, जीएसटी बिल, पोलीस व्हेरिफिकेशन, ड्रायव्हिंग लायसन्स आदी आवश्यक कागदपत्रे नसतानाही तसेच अवघे १७ वर्षांचे अल्पवयीन असल्याने नियमबाह्य पद्धतीने परप्रांतीय प्लास्टिक व खेळणी विक्री सुरू असल्याचे उघडकीस आले. यावर स्थानिक व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत सदर बेकायदेशीर विक्री तत्काळ बंद पाडली व दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून संबंधितांवर आवश्यक कारवाई करण्यात आली. व्यापारी संघटनेने स्पष्ट भूमिका घेतली की, बाजारपेठेत कायदेशीर परवाने व नोंदणी नसलेली विक्री स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर अन्याय करणारी आहे. यामुळे करचुकवेगिरी तर होतेच, शिवाय बाजारातील शिस्त व सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते.

यावेळी व्यापाऱ्यांनी आणखी गंभीर मुद्दा उपस्थित केला. दोडामार्ग तालुक्यात गावोगावी चोरीच्या घटना वाढत आहेत, मात्र परप्रांतीय व्यक्तींचे पोलीस ठाण्यात आधारकार्ड /ओळख व्हेरिफिकेशन नसल्याने बाहेरील व्यक्तींची अचूक माहिती उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत चोरांना पकडणे अवघड बनते. त्यामुळे “अशा व्यक्ती चोरी करत नाहीत, याची खात्री कोण देणार ?” असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला.

या पार्श्वभूमीवर संबंधितांना कडक सूचना देण्यात आल्या असून रस्त्यावरील बेकायदेशीर विक्री पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक व्यापाऱ्यांच्या हितासाठी पुढेही अशीच ठाम भूमिका घेतली जाईल, असा इशाराही व्यापारी संघटनेने दिला आहे.
या कारवाईवेळी व्यापारी अध्यक्ष सागर शिरसाट, वैभव इनामदार, भूषण सावंत, सुदेश मळीक, राजेश सावंत, दिनेश केसरकर, साजन गवस, नगरसेवक रामचंद्र मणेरीकर, आप्पा राणे, श्रीराम गवस आदी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिक व्यापाऱ्यांचा ठाम निर्धार :
कायदेशीर कागदपत्रांशिवाय कोणालाही बाजारपेठेत विक्रीस मुभा देणार नाही; स्थानिक व्यवसाय, करशिस्त व नागरिकांची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी शून्य सहनशीलता धोरण राबवले जाईल.


