मुंबई : लोकप्रिय डान्सर-अभिनेत्री नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत भीषण अपघात झाला. फ्रेंच म्युझिक प्रोड्यूसर आणि डीजे डेविड गुएटा याच्या कार्यक्रमास जाण्यासाठी ती घरातून निघाली होती. मात्र त्याचदरम्यान हा अपघात झाला. एक मद्यधुंद अवस्थेतील कारचालकाने त्याच्या कारने नोराच्या कारला जोरदार धडक दिली. यात गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने नोराला फारशी दुखापत झालेली असून ती किरकोल जखमी झाली. मात्र सुरक्षिततेचा उपाय म्हणून तिला चेकअपसाठी लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. याप्रकरणी मद्यधुंद चालकावर दाखल गुन्हा करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ” सनबर्न फेस्टिव्हलमध्ये डेव्हिड गुएटासोबत तिच्या नियोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी अभिनेत्री नोरा फतेही जात होती. मात्र तेव्हाच एका मद्यधुंद चालकाने तिच्या गाडीला धडक दिली. तिच्या टीमने तिला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेले,रक्तस्त्राव आणि अंतर्गत दुखापत तर झालेली नाही ना हे तपासण्यासाठी तिथे डॉक्टरांनी ताबडतोब सीटी स्कॅन केले. तिला मोठी दुखापत झालेली नसून किरकोल जखमी झाल्याचे नंतर डॉक्टरांनी सांगितलं, ” अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी कार ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आलं आहे.
अपघातानंतरही फेस्टिव्हलला जाण्याचा नोराचा निर्णय –
दुखापत किरकोल असली तरी डॉक्टरांनी नोराला आराम करण्याचा सल्ला दिला होता. मात्र जो कार्यक्रम आधीपासून ठरला आहे, त्याला हजेरी लावण्याचा निर्णय नोराने घेतला. त्यामुळे हॉस्पिटलमधील चेकअपनंतर ती त्या कार्यक्रमस्थळी रवाना झाली.
नोरा फतेही हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय चेहरा आहे. ती तिच्या नृत्य कौशल्यासाठी ओळखली जाते आणि तिने काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. 2014 साली “रोअर” नावाचा एक बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला, त्या चित्रपटातून नोराने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तिने मल्याळम चित्रपटातही काम केले आहे. शिवाय, ती सलमान खानच्या लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शो “बिग बॉस” चाही भाग राहिली आहे. ती शोच्या नवव्या सीझनमध्ये दिसली होती.
रजनीकांतच्या चित्रपटात दिसणार नोरा फतेही?
तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायंच झालं तर तिला नुकतंच रजनीकांतच्या आगामी ‘जेलर 2’ चित्रपटात कास्ट करण्यात आले आहे. 2026 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ती एका आयटम नंबरमध्ये दिसणार आहे. नोराने या चित्रपटासाठी चेन्नईमध्ये आठ दिवस एक गाणे शूट केल्याचेही वृत्त आहे.


