सावंतवाडी : आज स्व. विकासभाई यांची उणीव पावलापावलावर भासते. आमचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हेच या संस्थेचा खरा श्वास आणि ताकद आहेत. स्व. भाईसाहेब सावंत यांचा वारसा आणि स्व. विकास सावंत यांची शिकवण घेऊन आम्ही कार्यरत राहू. विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट सुविधा देण्यास संस्था कटिबद्ध आहे, असे भावुक उद्गार शिक्षण प्रसारक मंडळाचे युवा अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी काढले. शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ ‘स्नेहसंगम’ कार्यक्रमाचीमोठ्या उत्साहात सुरुवात झाली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी महत्त्वाची घोषणा करताना, आगामी वर्षापासून स्व. विकासभाई सावंत यांच्या स्मृतीप्रत्यर्थ ‘आदर्श पुरस्कार’ सुरू करण्यात येणार असल्याचेही जाहीर केले.
यावेळी सचिव माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक यांनी स्व. विकास सावंत यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रा. शैलेश नाईक, वसुधा मुळीक यांनीही आपली मनोगते व्यक्त केली, तर शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत यांनी शुभेच्छा संदेश दिला.
या सोहळ्यास उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, खजिनदार सी. एल. नाईक, अमोल सावंत, प्रा. सतीश बागवे, च. मु. सावंत, संदीप राणे, छाया सावंत, स्नेहा परब, मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पर्यवेक्षक नामदेव मुठे उपस्थित होते. तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजना ओटवणेकर, प्रिती सावंत आणि विद्यार्थी प्रतिनिधी सोहम पालव, सानिका ठाकूर, ओंकार चव्हाण, शुभम वरक, प्रांजली कबरे व भक्ती रजपूत उपस्थित होते.

प्रदर्शनाचे उद्घाटन व ‘मानस’ अंकाचे प्रकाशन –
कार्यक्रमाचा प्रारंभ संस्थाध्यक्ष विक्रांत सावंत यांच्या हस्ते रंगावली आणि हस्तकला प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यालयाच्या ‘मानस’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे मार्गदर्शक स्व. विकास सावंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने मुख्य सोहळ्याची सुरुवात झाली.
गुणवंतांचा गौरव आणि आदर्श पुरस्कार वितरण-
या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यात आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. दशरथ राजगोळकर व निवृत्त मुख्याध्यापक पी. एम. सावंत यांना, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार अर्जुन गवंडी यांना तर प्राचार्य ज. बा. शिरोडकर आदर्श विद्यार्थी / विद्यार्थिनी पुरस्कार उत्कर्ष आदारी, आस्था लिंगवत, योगेश जोशी, वैष्णवी गावडे, शुभम शिरोडकर, श्रावणी सावंत, चिन्मय असनकर, अदिती राजाध्यक्ष, ओंकार गवस, श्रेया गवस, सानिका ठाकूर, दीप राऊळ, ऋतुजा नाईक, प्रणिता आयरे, स्वप्नील लाखे, वैभव निकम आणि तन्वी काणेकर (डॉ. दिनेश नागवेकर पुरस्कृत) यांना देण्यात आले.
कार्यक्रमाचे अहवाल वाचन उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक – धुरी यांनी केले तर बहारदार सूत्रसंचालन प्रा. मिलिंद कासार, सौ. पुनम कोचरेकर यांनी केले शेवटी आभार प्रा. संतोष पाथरवट यांनी मानले.


