सहाव्या दिवशीही झोळंबे-घारपी-फुकेरी अंधारातचं! ; …. अन्यथा उद्या सासोली सबस्टेशनवर वीज ग्राहक संघटनेचे ठिय्या आंदोलन !

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे, घारपी आणि फुकेरी या गावांमध्ये सलग सहा दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. पावसाळ्यातील गंभीर परिस्थितीतही वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला अपयश आल्याने संतप्त झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज, गुरुवार (९ जुलै) अखेर वीजपुरवठा सुरू न झाल्यास शुक्रवार (१० जुलै) रोजी सासोली सबस्टेशन येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संघटनेचे अध्यक्ष सुभाष दळवी आणि सचिव भूषण सावंत यांनी दिला आहे.

झोळंबे-घारपी-फुकेरी या विद्युत वाहिनीवर अनेक ठिकाणी वीज खांब कोसळल्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. सलग सहा दिवस वीज नसल्याने नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून मोबाईल चार्जिंग, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, दैनंदिन व्यवहार तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दुर्गम भागातील नागरिकांचा बाहेरील जगाशी संपर्कही मोठ्या प्रमाणात विस्कळित झाला आहे.

या भागातील वीज ग्राहकांनी आपल्या अडचणी वीज ग्राहक संघटनेकडे मांडत तातडीने वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर संघटनेचे सचिव भूषण सावंत यांनी संबंधित अभियंता श्री. नायर यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. ज्या भागात पर्यायी फिडरद्वारे वीजपुरवठा सुरू करणे शक्य आहे, त्या ठिकाणी तातडीने वीज सुरू करावी, तसेच दुरुस्तीच्या कामासाठी आवश्यक असल्यास स्थानिक वीज ग्राहक संघटना पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, आज (९ जुलै) अखेरही वीजपुरवठा सुरू झाला नाही, तर उद्या (१० जुलै) सासोली सबस्टेशन येथे वीज ग्राहकांच्या सहभागातून ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत महावितरणने विलंब न करता युद्धपातळीवर काम करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles