कोल्हापूर : ऐन निवडणुकीत कोल्हापुरात दारुचा महापूर आला आहे. कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणने 7 लाख 40 हजार 880 रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकरयांनी अवैध दारुची विक्री व वाहतूक व साठा करणाऱ्यांवर कारवाई करणेसाठी वेगवेगळी पथके तयार केली आहेत.
साडे सात लाख किंमतीची गोवा बनावटीची दारु जप्त-
अवैध दारुवर कारवाई करणेसाठी माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेला पार्ले, (ता. चंदगड) गावच्या हद्दीत जुवाव सालदाना यांचे मालकीचे पत्र्याचे शेडचे बाजूला उघडयावर गोवा बनावटीचे दारुचा साठा केल्याची गोपनीय माहिती मिळाली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांचे पथकाने पार्लेतच छापेमारी केली. छापेमारीत शिवाजी धाकलू गावडे (वय 38, रा. पार्ले, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) याच्याकडे जवळपास साडे सात लाख किंमतीची गोवा बनावटीची दारु मिळून आली.
अधिक चौकशी केली असता त्याने सदरची दारु महाराष्ट्राचा कर चुकविणेसाठी गोवा राज्यातून विक्री करणेसाठी आणली असल्याची कबूली दिली. सदरची दारु कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करणेत आली असून आरोपीविरुद्ध चंदगड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर,पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, समीर कांबळे, राजू कांबळे, सतिश जंगम, प्रकाश पाटील, दीपक घोरपडे, सागर चौगले व सुशील पाटील यांचे पथकाने केली.


