Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

‘ती’ आली, रमली आणि जिंकलीसुध्दा.! : ॲड. नकुल पार्सेकर.

सावंतवाडी : गुळाची ढेप असल्यावर डोमळे आपोआप जमा होतात. पैसा फेको तमाशा देखो…..
होय, आजच्या निवडणूका म्हणजे पैशांचा खेळ. मतांच्याही दरामध्ये स्पर्धा असते. एकगठ्ठा मतं मिळवून देणारे राजकीय दलालही कार्यरत असतात. गावातील कष्टकरी, गोरगरीब महिला, वृध्द यांच्या अज्ञानाचा आणि अगतिकतेचा फायदा घेऊन राजकीय पक्षाचे दलाल या बिचाऱ्यांशी सौदा करतात. भारतीय संसदीय लोकशाहीत निवडणूका यापूर्वीपण संपन्न झाल्या. स्व. टी. एन्. शेषन निवडणूक आयुक्त असताना नाही म्हटलं तरी मोठ्या प्रमाणात आदर्श आचारसंहिता पाळली गेली होती. आजची परिस्थिती तर अतिशय विदारक आहे. निवडणूकांचा हा बाजार आम्हाला कुठपर्यंत घेऊन जाणार आहे? देव जाणो.नजिकच्या काळात तरी या प्रश्र्नाचे उत्तर मिळणे कठीण आहे.

यापूर्वी मी एक कार्यकर्ता म्हणून मा. सुरेश प्रभू यांच्या लोकसभांच्या चार निवडणूका, सावंतवाडीत सेना भाजपचे उमेदवार शिवराम दळवी आणि कणकवली मतदारसंघात भाजपा सेनेचे उमेदवार श्री प्रमोद जठार यांच्या निवडणूकीत सक्रिय असल्याने जवळून अनुभव घेतला.. प्रत्येकवेळची राजकीय परिस्थिती वेगळी होती. समाजमाध्यमांचा आता जेवढा आहे तेवढा सुळसुळाट नव्हता. प्रभूंच्या निवडणूकीत तर ही उपलब्धताच नव्हती.

आता यावेळची सावंतवाडी मतदारसंघातील निवडणूक ही फारच रंजक आहे. दोन अपक्ष उमेदवाराने फारच रंगत आणलेली आहे. निवडणूक एवढ्या विचित्र टप्यावर येवून पोहचली आहे की स्वयंघोषित महाराष्ट्राचे मोठे नेते समजले जाणारे दिपक केसरकर हे निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मी महाराष्ट्राचा नेता असल्याने तसेच चांगला वक्ता असल्याने मला संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी आहे त्यामुळे मी माझ्या मतदारसंघात उमेदवारी भरताना व फक्त शेवटचे चार दिवस प्रचाराला येणार अशी भीमगर्जना केली होती. निवडणूकीचा अंदाज आणि गावागावात असलेला प्रचंड आक्रोश लक्षात घेऊन आणि वाऱ्याची दिशा ओळखून गेले वीस दिवस केसरकर ठाण मांडून मतदारसंघात आहेत आणि राञदिवस फिरत आहेत. अपक्षांना आणि विशेषतः अर्चना घारे यानां दुर्लक्षून चालणार नाही हे त्यानी ओळखल. याची प्रचिती काही गावात आणि वाडी वस्त्यावर फिरत असताना आणि लोकांशी संवाद साधल्यावर मला आली.

माडखोल येथील निवृत्त शिक्षकांना भेटलो.. ते म्हणाले माझा आणि अर्चना हीची ओळख नाही पण मी आजपासून माझ्या स्वतःच्या खर्चात तिच्यासाठी फिरणार आहे. स्वार्थासाठी वारंवार पक्ष बदलून राजकारणाचा चिखल करणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे. असं म्हणून मला त्यांनी अर्चनाला फोंन लावून द्यायला सांगितला व भरभरून आशिर्वाद दिले.

आरोस येथील असेच एक निवृतीधारक भेटले. ते म्हणाले, ती मुलगी नव्याने राजकारणात येत आहे. चांगल्या माणसांची वानवा आहे. माझ्या वाडीत ऐंशीहून जास्त मतं आहेत ती जास्तीत जास्त तिला कशी मिळतील यासाठी मी प्रयत्न करणार.

न्हावेली येथे एका वृध्द आजीला भेटलो. कोरोना काळात माझ्या क्षमतेनुसार मी तिला वैद्यकीय मदत केली होती. ती म्हणाली, ता पोरग्या खूपच प्रेमळ आसा. खराचं ता आमदार होवकं व्हया. आरोंदा येथील मुंबईला असणारा माझा मित्र मी फोन केल्यावर म्हणाला, मी मुद्दामहून मतदानाला येणार, खुप तळमळीने ती मुलगी गेली सहा सात वर्षे काम करत आहे. ग्रामीण भागात फिरताना या अशा अनेक सकारात्मक प्रतिक्रिया ऐकायला, अनुभवायला मिळतात.

राजकारणात लोक का येतात ? त्याचे आजच्या राजकीय परिस्थितीचे विश्लेषण केल्यास लक्षात येत की गडगंज पैसा कमवणे आणि आपल्याच कुटुंबातील राजकीय वारसदार निश्चित करुन पुढच्या पाच पन्नास पिढ्यांची तरतूद करणे. नाहीतर अनेक राजकीय नेत्यांच्या संपत्तीचा तपशील आपण पहातो तेव्हा आकडे बघून डोळे दिपून जातात. शेकडो कोटींची उड्डाणे घेणारे हे नेते एवढा गडगंज पैसा कसा काय कमवतात..

मी जेव्हा अर्चनाताईला हा प्रश्न विचारला तेव्हा त्या म्हणाल्या, सुदैवाने माझ्या घरची आणि माहेरची परिस्थिती अतिशय चांगली आहे. अगदी व्यवस्थीत मजेत जीवन व्यतीत करू शकले असते.. पण या जन्मभूमीत याच हलाखीच्या परिस्थितीतून मी गेलेय ज्या परिस्थितीत माझ्या असंख्य माता, भगिनी, भाऊ आणि जेष्ठ आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी रचनात्मक काम कराव ज्यातून मला आत्मिक समाधान मिळेल.

राजकीय व्यवस्थेबाबत अतिशय निराशाजनक परिस्थिती असताना एका अतिशय दुर्गम खेड्यात जन्माला आलेली मुलगी असा आशावाद घेऊन प्रयत्न करत असेल तर तिला सद्याचा राजकीय चिखल पाहून निराशेच्या गर्दीत हरवलेल्या तुम्ही आम्ही प्रत्येकाने तिच्या या प्रयत्नाला हात दिला पाहिजे. साथ दिली पाहिजे. काही गावात फिरत असताना अर्चनाताईंच्या पाठीशी असे असंख्य हात आहेत जे लिफाफा या निशाणीचे बटन दाबून या भूमिकन्येला आपली हक्काची आमदारीणं म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवून या सुसंस्कृत मतदार संघाचा नव्याने इतिहास लिहीतील. असा विश्वास वाटतो.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles