सावंतवाडी : तालुक्यातील ओटवणे-गावठणवाडी येथील एका सामाईक घराच्या असेसमेंटमध्ये परस्पर फेरफार करत सामाईक घर एकाच व्यक्तीच्या नावावर केले. त्यामुळे सदरचे नियमबाह्य असेसमेंट रद्द करून घराची फेरआकारणी करावी. तसेच ओटवणे सरपंच आत्माराम शिवराम गावकर यांनी आपल्या अधिकारांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ओटवणे गावठणवाडी येथील विजय अनंत गावकर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत प्रसिद्धी पत्रकात विजय गावकर यांनी म्हटले आहे की, ग्रामपंचायत घर क्र. २५९ अ (वसंत शिवराम गावकर), २५९ ब (सुरेश शिवराम गावकर), २५९ क (विजय अनंत गावकर), घर क्र. २६० (शिवराम शंभा गावकर) यांच्या नावे वडिलोपार्जित सामाईक घर होते. सदरचे घर जीर्ण झाल्यामुळे नवीन बांधण्यात आले. त्यानंतर पूर्वीप्रमाणे या घराची घरपट्टी आकारण्यासाठी अर्ज करण्यात आला. मात्र, सरपंचांनी नियमाप्रमाणे या अर्जाचा मासिक बैठकीत विषय घेतला नाही. त्यानंतर शिवराम गावकर यांचे भाऊ प्रभाकर गावकर यांनी घर क्रमांक २६० ची फेरआकारणीची मागणी केल्यानंतर ग्रामसेवकांनी हा विषय ग्रामसभेच्या अधिकार कक्षेत येत नसल्याचे सांगूनही सरपंचांनी बेकायदेशीरपणे हा विषय ग्रामसभेत घेत मंजूर करताना संपूर्ण घर शिवराम गावकर यांच्या नावे केले.
दरम्यान, याबाबत सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी सदर ग्रामसभेतील ठरावाद्वारे केलेली कार्यवाही बेकायदेशीर असल्याचे ग्रामपंचायतीला दोनवेळा कळवून नियमानुकुल कार्यवाही करण्याचे आदेश दिले. मात्र, ग्रामपंचायतीने अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे घर क्र. २६० चा असेसमेंट रद्द ‘करून या घराची फेरआकारणी करावी. तसेच सरपंचांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याबद्दल त्यांच्यावर नियमोचित कारवाई करावी, अशी विजय गावकर यांची मागणी आहे.
ADVT –



