नवी दिल्ली : वूमन्सनंतर आता अवघ्या काही मिनिटांनी मेन्स खो खो टीम इंडियाने इतिहास रचला आहे. मेन्स टीम इंडियाने पहिलावहिला खो खो वर्ल्ड कप जिंकला आहे. मेन्स टीम इंडियाच्या या विजयाने भारताचा आनंद द्विगुणित झाला आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्यावहिल्या खो खो वर्ल्ड कपमध्ये भारताचा दबदबा पाहायला मिळाला. टीम इंडियाच्या मेन्स आणि वूमन्स दोन्ही संघांनी अंतिम फेरीत नेपाळचाच पराभव केला. त्यामुळे नेपाळच्या दोन्ही संघांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. मेन्स टीम इंडिया या स्पर्धेत अजिंक्य राहिली. टीम इंडियाने अंतिम सामन्यात नेपाळवर 54-36 अशा फरकाने विजय मिळवला. या विजयानंतर टीम इंडियाचं सोशल मीडियावर अभिनंदन केलं जात आहे.
पहिल्या सत्रात टीम इंडियाची कडक सुरुवात
टीम इंडियाने या महाअंतिम सामन्यातील पहिल्या सत्रात अप्रतिम सुरुवात केली. तसेच दुसऱ्या बाजूला नेपाळला एकही पॉइंट मिळवून दिला नाही. टीम इंडियाने या सत्रात 26 पॉइंट्स मिळवले. तर नेपाळला खातंही उघडू दिलं नाही. टीम इंडियाने अशाप्रकारे पहिल्या सत्रानंतर 26-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली.
नेपाळचं कमबॅक मात्र भारताकडेच आघाडी –
नेपाळने दुसऱ्या सत्रात खातं उघडलं आणि कमबॅक केलं. मात्र टीम इंडियाने 8 पॉइंट्सने आघाडी कायम ठेवली. नेपाळने दुसऱ्या सत्रात एकूण 18 पॉइंट्स मिळवले.
तिसऱ्या सत्रात भारताचं कमबॅक –
टीम इंडियाने तिसऱ्या सत्रात दणक्यात कमबॅक केलं आणि नेपाळला सामन्यातून बाहेर केलं. टीम इंडियाने तिसर्या सत्रात पॉइंट्सची लयलूट केली आणि 50 पार मजल मारली.
टीम इंडिया खो खो वर्ल्ड चॅम्पियन –
टीम इंडियाने तिसऱ्या सत्रातील आघाडी चौथ्या सत्रातही कायम ठेवली आणि नेपाळवर सलग दुसऱ्यांदा मात करत अंतिम सामना हा 54-36 अशा फरकाने जिकंला. टीम इंडिया यासह विश्व विजेता ठरली.
दरम्यान टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील नेपाळवरील दुसरा विजय ठरला. दोन्ही संघ साखळी फेरीत आमनेसामने होते. टीम इंडियाने साखळी फेरीतही नेपाळला पराभवाची धुळ चारली होती. या स्पर्धेत एकूण 20 संघांनी सहभाग घेतला होता. या 19 संघांवर वरचढ ठरत टीम इंडियाने हा वर्ल्ड कप जिंकला.


