अहिल्यानगर : येथे सुरू असलेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लागला असून त्यामध्ये पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने बाजी मारली. त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला आणि महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावला. या विजयानंतर पृथ्वीराज मोहोळच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये अंतिम लढत झाली. त्यामध्ये पृथ्वीराज मोहोळला पहिला पॉईंट मिळाला. नंतर दुसरा पॉईंट महेंद्र गायकवाडने मिळवला आणि बरोबरी केली. त्यानंतर पृथ्वीराज मोहोळने पुन्हा एकदा एक पॉईंट घेतला. त्यानंतर मात्र काहीसा गोंधळ झाला आणि महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं. त्यामुळे पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केलं.
पृथ्वीराज मोहोळच्या विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याला चांदीची गदा आणि थार गाडी देण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गोंधळ आणि वादाची किनार लाभली. या स्पर्धेतील उपांत्य फेरीत वाद झाला. कुस्तीपटू शिवराज राक्षे पराभव झाल्याचं घोषित केल्याने भडकला. त्यानंतर त्याने पंचांन लाथ मारल्याचं सांगितलं जातं आहे. पाठ टेकली नसल्याचं सांगत शिवराज राक्षेने वाद घातला. पण पृथ्वीराज मोहोळला विजय घोषित केलं. अंतिम फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना रंगला. अंतिम सामन्यात पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड आमनेसामने आले होते. सलग दुसऱ्या वर्षी महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला होता. अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ हा महेंद्र गायकवाडवर भारी पडला आणि सामना जिंकला. महेंद्र गायकवाड याने निकालावर आक्षेप घेत मैदान सोडले. पंचांसोबत हमरीतुमरी झाल्यानंतर महेंद्र गायकवाड उघडा होऊन मैदानाबाहेर गेला. पृथ्वीराज मोहोळ 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला.


