सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत येणाऱ्या विविध शिक्षण संस्था तसेच जिल्हा परिषदेच्या होणाऱ्या शिक्षण सेवक भरती प्रक्रियेत स्थानिक बीएड बेरोजगार उमेदवारांचा विचार व्हावा आणि त्यांना संधी द्यावी, अन्यथा 23 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करू, असा अल्टिमेटम आज बी. एड. स्थानिक बेरोजगार संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.
2012 नंतर शिक्षण सेवक भरती प्रक्रिया बंद झाली आणि बीएड बेरोजगारांच्या हाताला काम नसल्यामुळे दिवसेंदिवस ही संख्या वाढत गेली. ही भरती प्रक्रिया रखडल्यामुळे आता अनेक जण वयाच्या अटीमुळे शिक्षक भरती प्रक्रियेतून बाद होणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी वयाची अट शिथिल करण्यात यावी. सिंधुदुर्ग जिल्हा डोंगरी जिल्हा घोषित करून त्यानुसार पटसंखेचा निश्चय जाहीर करण्यात यावा. उच्चशिक्षित पदव्युत्तर उमेदवारांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना केंद्रप्रमुख सारख्या पदांवर सामावून घेतले जावे. त्यासाठी हवे तर त्यांना सहा महिन्याचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशा अनेक मागण्या यावेळी त्यांनी केल्या आहेत.
प्रशिक्षित व अनुभवी शिक्षकांना रुपये 35,000/ एवढ्या मानधनावर तसेच सहाय्यक शिक्षकांना प्रति महिना तीस हजार रुपये मानधनावर तात्पुरत्या सेवेत रुजू करून घेण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, याबाबत आपल्या मागण्यांकडे या जिल्ह्याचे शिक्षण मंत्री तसेच जिल्हा परिषद सदस्य यांनी तात्काळ सकारात्मक भूमिका घ्याव, अशी विनंती त्यांनी केली आहे. यावेळी बी.एड. बेरोजगार संघटनेच्या रेश्मा शिरसाट, श्रीराम कानसे, रसिका दळवी, सोनाली परब, सिंथिया त्रिदाद, मिलन राणे, दीपिका कांबळे, हर्षा ताम्हाणेकर, गौरी हिवाळेकर शाम निकम, श्रीकांत परब, क्रांती मयेकर, रिया धर्णे, रीना घोडे, प्रज्ञा पार्सेकर, दीपस्वी दळवी, विठू गुरव, वैष्णवी चव्हाण, सौरभ पाटकर, लक्ष्मी गोसावी, समृद्धी परब, रुचिता राऊत, प्रणाली परब, भक्ती नाईक, सहदेव नाईक, उज्वला निकम आदी उपस्थित होते.


