सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील जेथे जेथे ग्रामपंचायतींमध्ये भारतीय जनता पार्टीचा सरपंच आहे आणि ज्या ग्रामपंचायती भाजपाकडे आहेत, तेथील सरपंच व पदाधिकाऱ्यांना त्रास देण्याचे काम राज्याचे शिक्षण मंत्री व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर करीत आहेत. तसेच तळवडे ग्रामपंचायत घोटाळा प्रकरणातील प्रमुख संशयित सरपंच यांना मंत्री केसरकर छुपे मदत करतात, असा थेट आरोप भारतीय जनता पार्टीचे युवा नेते तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय संदीप गावडे यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
सावंतवाडी येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पंकज पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य दादा परब, मंगलदास पेडणेकर, सुरेश मांजरेकर, नम्रता गावडे, स्मिता गावडे आदी तळवडे येथील पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान पत्रकार परिषदेत संदीप गावडे पुढे म्हणाले, की तळवडे ग्रामपंचायत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा अपहार झाला आहे. यातील सुमारे 62 लाख रुपयांची अपहार झाल्याची माहिती समोर आली आहे. यात येथील सरपंच, ग्रामसेवक आणि तीन ठेकेदार यांच्यावर संशय आहे. अजून काही संशयित या ठिकाणी समाविष्ट असून त्यांचाही शोध सुरू आहे. मात्र या प्रकरणात सरपंचांना वाचविण्यासाठी चक्क राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर छुपे मदत करीत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
या पत्रकार परिषदेत दादा परब यांनी तळवडेच्या अपहर प्रकरणाची माहिती दिली. नुकताच पालकमंत्र्यांनी घेतलेल्या जनता दरबारात तक्रार केल्यानंतर संशयीतांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही काहीही करून आरोपींना सोडणार नाहीत. त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा युवा नेते संदीप गावडे यांनी यावेळी दिला.


