वैभववाडी : डिसेंबर २०२३ पासून बंद असलेला करुळ घाट जवळपास १४ महिन्यांनी म्हणजे दि.२४ फेब्रुवारी,२०२५ पासून एकेरी वाहतूकीसाठी सुरु करण्यात आला आहे. हलक्या वाहनासह, ट्रक, खाजगी आराम बस सारखी वाहने घाटातून जाऊ लागली आहेत. मात्र सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेली एस. टी. सुरू झालेली नाही. ती लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने जिल्हाधिकारीसो तथा अध्यक्ष जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, विभाग नियंत्रक रा.प. सिंधुदुर्ग व पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.
करुळ घाट सुरु होऊनही सर्वसामान्य प्रवासी ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.
डिसेंबर २०२३ पासून करूळ घाटाच्या नूतनीकरणासाठी घाट मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. दि.२४ फेब्रुवारीपासून करूळ घाटातून वैभववाडी कोल्हापूर मार्गे एकेरी वाहतूक सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिले आहेत. त्यानुसार घाटातून हलकी, ट्रक, खाजगी आराम बस, सारखी वाहने जाऊ लागली आहेत. घाटातून वाहतूक सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र घाटातील एकेरी वाहतूक सुरू होऊन आठ दिवस झाले तरी अद्यापही एसटी वाहतूक सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी ग्राहकांना त्याचा कोणताही फायदा झालेला नाही.
करूळ घाट दुरुस्तीसाठी बंद असल्यामुळे गेली १४ महिने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंडाबरोबरच शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. करूळ घाटाला पर्यायी घाट मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुईबावडा घाटातूनही गेल्या सप्टेंबर महिन्यापासून सुरक्षितेच्या कारणामुळे फक्त सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच एसटी वाहतूक सुरू आहे. रात्रीच्या वेळी पूर्णपणे भुईबावडा घाटातून एसटी वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांना फोंडाघाट अथवा अनुस्कुरा घाटाचा पर्याय किंवा खाजगी वाहनाचा आधार दामदुपट्ट भाडे देऊन नाईलाजाने स्वीकारावा लागत आहे.
वाहतूक नियंत्रक वैभववाडी यांच्याशी संपर्क साधला असता, एस टी वाहतूक सुरु करणेबाबत अद्याप आम्हांला वरिष्ठ कार्यालयाकडून सांगण्यात आले नसल्याचे सांगितले.
त्यामुळे करूळ घाटातून एस टी बस सेवा सुरु करावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने संबंधित प्रशासनाकडे मेलद्वारे केली आहे.
ADVT –



