ठाणे : समाजवादी पक्षाचे नेते व मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार अबू आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही. औरंगजेबने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिंदू मंदिरे बांधली. तो एक महान राजा होता. त्याच्या काळात भारत ‘सोने की चिड़िया’ होता. त्याची राजवट पाहूनच इंग्रज भारतात आले होते, असं विधान करत आझमी यांनी अकलेचे तारे तोडले होते. मात्र याच विधानामुळे ते आता गोत्यात येण्याची शक्यता आहे. अबू आझमी यांच्या या विधानानंतर आता त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्या तक्रारीवर ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्या अबू आझमी यांच्या विरोधात शिवसेनेनं सोमवारी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. वादग्रस्त वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करणे, हिंदूंच्या भावना दुखावणे, सरकार विरोधात अपप्रचार करणं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भारतीय न्याय संहिता कलम २९९,३०२, ३५६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
काय म्हणाले अबू आझमी.?
मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले आमदार अबू आझमी यांनी नुकतंच एक विधान केलं. मुगल सम्राट औरंगजेब याचे त्यांनी कौतुक केलं होतं. औरंगजेब क्रूर शासक नव्हता. त्याने अनेक मंदिरे बनवली, असा दावा अबू आझमी यांनी केला. मात्र त्यांच्या या विधानानंतर वातावरण तापलं असून चहूबाजूंनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात येत आहे.
‘मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही. औरंगजेबने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिंदू मंदिरे बांधली. तो एक महान राजा होता. त्याच्या काळात भारत ‘सोने की चिड़िया’ होता. त्याची राजवट पाहूनच इंग्रज भारतात आले होते. तो न्यायप्रेमी सम्राट होता. आम्हाला चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. वाराणसीमध्ये औरंगजेबाच्या एका सरदाराने पंडिताच्या मुलीशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा औरंगजेबाने त्याला हत्तीच्या पायाखाली चिरडले होते. औरंगजेबाची कबर खोदण्याची भाषा करणारे भाजप नेते जातीय सलोखा बिघडवत आहेत,’ असा आरोप अबू आझमी यांनी केला.
अटकेची मागणी –
त्यांच्या या विधानामुळे वातावरण तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी तर आझमी यांच्या अटकेची मागणी केली. आझमींचे हे वक्तव्य हिंदूंच्या भावना दुखावणारे आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांना अटक झाली पाहिजे, असे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले. तर आता शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली, त्यानंतर आझमींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अबू आझमी यांनी यापूर्वी औरंगजेबचे समर्थन केले आहे. 2023 मध्ये त्यांनी औरंगजेबचे समर्थन करणारे वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.



