देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबीनेट मंत्री श्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कोकण सन्मान भव्य सन्मान सोहळा गेली 2 वर्षे आयोजित केला जातो. या सोहळ्यात कोकणवासीयांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेतली जाते, तसेच विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या योगदानाचा आदरपूर्वक सन्मान केला जातो. कोकणच्या संस्कृती, समाजसेवा, शिक्षण, कला, आरोग्य, ग्रामविकास आणि इतर अनेक क्षेत्रांतील मान्यवरांचा या सोहळ्यात विशेष सत्कार करण्यात येतो. “ज्या मातीत आपण वाढलो, त्या मातीसाठी काहीतरी देणे लागतो” या विचाराने प्रेरित होऊन दयानंद कुबल यांनी आपल्या कोकण भूमीतच समाजसेवेची मुहूर्तमेढ रोवली. कोकणच्या मातीशी असलेली त्यांची बांधिलकी आणि समाजातील तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची त्यांची तळमळ यामुळेच त्यांचे कार्य अधिक प्रभावी ठरले आहे. आपल्याच परिसरात, आपल्या लोकांसाठी सेवा करणे आणि त्याच समाजातून पुरस्कार मिळणे एक अभिमानास्पद क्षण आहे. गेल्या १३ वर्षांत त्यांनी कोकण आणि महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात विविध सामाजिक प्रकल्पांद्वारे अनेक गरजूंना आधार दिला आहे. अनाथ मुले, आदिवासी पाडे, दुर्गम गावांतील नागरिक, तसेच शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी ठरले आहे. समाजसेवेच्या क्षेत्रातील त्यांच्या याच अतुलनीय योगदानाची दखल घेत, त्यांना कोकण सन्मान २०२५ मध्ये ‘Critics Award’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक २८/०२/२०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता वेदा हॉलिडे रिसॉर्ट, देवगड, कोकण येथे संपन्न झाला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. यात पद्मश्री परशुराम गंगावणे, हास्य जत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात, श्रीमान लिजंड, टाइम पास फेम कलाकार मनमित पेम, बिग बॉस फेम धनंजय पोवार आदी मान्यवर तर कार्यक्रमाची धुरा सांभाळण्यासाठी बिनधास्त मुलगी गौरी पवार, अंकिता प्रभू वालावलकर आणि शंतनू रांगणेकर आदी उपस्थित होते.


हा पुरस्कार स्वीकारताना दयानंद कुबल म्हणाले, “आपल्या जन्मभूमीत समाजसेवेचे कार्य करणे हीच माझ्यासाठी खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा आहे. या मातीसाठी काहीतरी देणे लागतो, हा विचार सदैव मनात असतो. हा सन्मान केवळ माझाच नाही, तर माझ्या सहकाऱ्यांचा, स्वयंसेवकांचा, समर्थकांचा आहे. आणि आमच्या कार्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे. हा पुरस्कार आम्हाला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देईल आणि समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा आमचा दृढ निर्धार आहे.”व हे कार्य असेच सुरू ठेवण्याचे वचन दिले आहे. या सोहळ्यामुळे कोकणच्या संस्कृतीचे आणि कोकणवासीयांच्या समाजसेवेतील योगदानाचे महत्त्व अधोरेखित झाले.
कोकणच्या मातीशी नाळ जोडून राहून, आपल्या समाजासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या दयानंद कुबल यांचे हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि समाजसेवेच्या मार्गावर नवे मापदंड निर्माण करेल, अशी अपेक्षा आहे.
ADVT –




