सागर : मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील होळीचा सण अत्यंत शांतपणे पार पडला होता. संध्यकाळी पोलीस स्टेशनमध्ये बसून पोलीस याचीच चर्चा करत होते. तेवढ्यात अचानक खणखण करत फोनची घंटी वाजली. एका पोलिसाने फोन उचलला. इकडे वरिष्ठांच्या गप्पाटप्पा सुरू होत्या. हंसी मजाक सुरू होती. अचानक या सर्वांची नजर फोनवर बोलणाऱ्या पोलिसाकडे गेली. बोलणाऱ्याचा चेहरा पडला होता. चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. तो चिंताक्रांत वाटत होता. त्यामुळे इतर पोलीसही स्तब्ध झाले. सहकारी पोलिसाने फोन ठेवताच इतरांनी त्याला विचारलं काय झालं? त्यावर त्याने जे सांगितलं त्याने इतर पोलीसही हादरून गेले. ”गावात मर्डर झालाय!” पोलिसाचं हे वाक्य ऐकताच पोलीस ठाण्याचे प्रभारी शशी विश्वकर्मा अलर्ट झाले. त्यांनी लगेच गाडी काढली आणि स्टाफला घेऊन सायरन वाजवतच गावाच्या दिशेने निघाल्या. गावाच्या गल्लोगल्लीतून सायरन वाजवत पोलिसांची गाडी धावत होती. ज्या घरात मर्डर झाली तिथे लोक दरवाजात उभे होते. तरुणाच्या हत्येची बातमी गावभर पसरली होती. या तरुणाचे वृद्ध आईवडील रडत होते. बायको आणि सर्वांचेच रडून रडून हाल झाले होते. त्यांचं रडणं ऐकून काळजात धस्स होत होतं. इतक्या जिवाच्या आकांताने सर्वांनी टाहोफोडला होता. चिल्यापिल्यांचे तर रडून रडून डोळे सूजले होते. रडता रडता त्यांची डोळ्यातील अश्रूसोबतच नाकही वाहत होतं.
अन् तो तरूण…
पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी हा संपूर्ण प्रकार पाहिला. आधी त्या तरुणांच्या घरच्यांना दिलासा देण्याचं काम पोलिसांनी केलं. पण हे करत असताना काही तरी गडबड असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्या तरुणाची नाडी चेक केली. जेव्हा पोलिसांनी त्याची नाडी तपासली तेव्हा तो तरुण जिवंत असल्याचं दिसलं. त्याचे श्वास सुरू असल्याचं आणि नाडी व्यवस्थित चालू असल्याचंही दिसून आलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या नावाने हाक मारली. पोलिसांची हाक ऐकताच हा तरुण अचानक उठून बसला. हे पाहून पोलीसही आश्चर्यचकीत झाले. गावातील लोकही हैराण झाले आणि गावकऱ्यांची कुजबूज सुरू झाली. एव्हाना घरातील रडारड थांबली होती.
मर्डर झालेला तरुण जिवंत आहे, ही बातमीही वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यामुळे इतर गावकरीही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी या युवकाला गाडीत बसवलं आणि थेट रुग्णालयात नेऊन दाखल केलं.
दारू पिऊन धिंगाणा –
सागर जिल्ह्यातील खुरई शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खजरा हरचंद गावातील हे प्रकरण आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी शशी विश्वकर्मा यांनी याबाबतची माहिती घेतली तेव्हा त्यांच्यासमोर सर्व उलगडा झाला. गावातील राजेश अहिरवार आणि नर्मदा प्रसाद अहिरवार यांच्यात दारूच्या नशेत झगडा झाला होता. यावेळी राजेशने नर्मदाला धक्का दिला. त्यामुळे तो पडला आणि त्याने मेल्याचं नाटक केलं. तो मेला म्हणून आपल्यावर खूनाचा आरोप होऊ नये म्हणून नर्मदाच्या कुटुंबियांनीही रडण्याचं नाटक केलं. ही रडारड पाहून सर्व गावात राजेश मेल्याची बातमी पोहोचली. पण जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा या प्रकरणाचा पर्दाफाश झाला.
चुकीची माहिती दिल्याने कारवाई –
पोलिसांनी राजेश अहिरवारच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच नर्मदाच्या भावाने फोन करून राजेश मेल्याची माहिती दिली होती. पण मलाच तशी माहिती मिळाली होती म्हणून मी तशी माहिती तुम्हाला दिली असं नर्मदाच्या भावाने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी चुकीची माहिती दिल्याबद्दलही कारवाई केली आहे.


