सावंतवाडी : संस्कृत ही भाषा मधूर असून या भाषेतून मुलांच्यावरती चांगले संस्कार होतात, असे उद्गार नेमळे प्रशालेच्या प्राचार्या कल्पना बोवलेकर यांनी काढले. संस्कृत ही देव वाणी आहे. अनादी काळापासून या भाषेला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. सद्या या भाषेचा प्रचार व प्रसार केला पाहिजे, असे मत शिक्षक पांडुरंग दळवी यांनी व्यक्त केले. संस्कृत दिनाचे औचित्य साधून नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयात संस्कृत श्लोक पठण स्पर्धेचे दोन गटांत आयोजन केले होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिल कांबळे म्हणाले, ऋषिमुनींचे स्मरण करायचा हा दिवस असून दरवर्षी संस्कृत पठण स्पर्धेचे आयोजन केले जाते. यातून विद्यार्थ्यांना पाठांतर करायची चांगली सवय लागते व संस्कृत विषयाची गोडी निर्माण होते. आठवीच्या मुलांनी ‘चटक ! चटक व सर ! सर आयान्ति वर्षांधारा’ ही दोन संस्कृत समूहगीते सादर केली. तुकाराम परब व आर्यन कानसे या आठवीतील मुलांनी संगीत साथ दिली. संस्कृत श्लोक पठण स्पर्धेचेपरीक्षण उमेश राऊळ सरांनी केले.
संस्कृत श्लोक स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे-
लहान गट- प्रथम- यज्ञेश युवराज शिंदे, द्वितीय – लौकिक श्रीराम कदम, तृतीय – लतिका हेमंत मेस्री.
मोठा गट – प्रथम – विश्वजीत सदानंद पेंडसे, द्वितीय – मिताली गणपत खोत, तृतीय – निधी गुरुनाथ धुरी.
या स्पर्धेसाठी विद्यालयाच्या माजी शिक्षिका श्रीम. श्रध्दा नाईक मॅडम यांनी ठेव ठेवली असून त्याच्या व्याजातून विद्यार्थ्यांना बक्षीसे दिली जातात.


