छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन राज्यभरात वाद सुरू असताना या वादाचा परिणाम छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटनावर झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनात तब्बल ४० ते ६० टक्के घट झाल्याचे समोर आले आहे. औरंगजेबाच्या कबरीचा वाद राज्यभर सुरू असताना दुसरीकडे त्याचा परिणाम मात्र छत्रपती संभाजीनगरमधील पर्यटनावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील पर्यटनात घट झाल्याची धक्कादायक महिती पुरातत्व विभागाने दिलेल्या माहितीतून उघड झाली आहे. अजिंठा, वेरूळ, बिबी का मकबरा, दौलताबाद या पर्यटन स्थळावरील पर्यटनात मोठी घट झाली आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला पर्यटनाची राजधानी म्हणून संबोधलं जातं. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ-मोठे जागतिक वारसा स्थळं असून त्याला भेट देण्यासाठी राज्यभरातील पर्यटकांसह देशातील आणि परदेशी पर्यटक नेहमी येत असतात. दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीचा वाद सुरू असताना औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


