देवगड : समग्र शिक्षा अंतर्गत राज्यातील निवडक शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापित केल्या असून प्रत्येक शाळेवर या संगणक प्रयोगशाळेसाठी एक प्रशिक्षक सुद्धा रुजू करण्यात आलेले आहेत, आधुनिक काळात टिकायचे असेल तर संगणकाशी मैत्री करावी लागेल हे उद्दिष्ट समोर ठेवून, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई ,राज्य प्रकल्प संचालक यांनी आयसीटी (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) हा उपक्रम राबविण्याचे योजिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ०५ शाळांमध्ये व ०२ गटसाधन केंद्रामध्ये हा उपक्रम चालू असून, अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या सूचनेप्रमाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माननीय श्री.डॉ.गणपती कमळकर, समग्र जिल्हा समन्वयक श्रीम. स्मिता नलावडे यांच्या मार्गदर्शनाने राबविण्यात येत आहे, तर येणाऱ्या काळात शाळेतील विद्यार्थी संगणक साक्षरतेच्या गुणांकणात वाढ होऊन या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे असून सर्वच ठिकाणी सांगणकाचा वापर होत आहे. डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीसाठी शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचे धडे मिळणे आवश्यक आहे. आधुनिक काळात टिकायचे असेल तर संगणकाशी मैत्री करावी लागेल.
शहरी व खाजगी महागड्या शाळेत दिसणारी संगणक प्रयोगशाळा आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गमभागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पाहायला मिळत आहे. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळावा. असे प्रयत्न संगणक प्रशिक्षकांच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. उल्लेखनीय म्हणजे या उपक्रमाचा येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल, असे मत शाळेतील मुख्याध्यापकांनी देखील व्यक्त केले आहे.
विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण व प्रोजेक्टरच्या माध्यमातून विज्ञान, इतिहास भूगोल या विषयाचे प्रात्यक्षीक विषयाचे अध्यापन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक सुलभ पद्धतीने अध्यापन केले जात आहे.