बांदा : अक्कलकोटच्या पवित्र भूमीत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक होत धार्मिक श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि परस्पर स्नेहभावाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी बांदा येथील पत्रकार नीलेश मोरजकर यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचे कृपावस्त्र आणि प्रसाद देऊन सन्मानित केले. भक्तिभावाच्या या मंगलमय वातावरणात झालेल्या भेटीने कोकण आणि अक्कलकोट यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ झाले.
श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा बांदा नट वाचनालयाचे उपाध्यक्ष असलेले पत्रकार नीलेश मोरजकर यांनी यावेळी महेश इंगळे यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी आपल्या प्रभागातून सलग पाचव्यांदा विक्रमी मताधिक्याने नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा बहुमान मिळविल्याबद्दल मोरजकर यांच्या हस्ते इंगळे यांचा शाल देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
सातत्यपूर्ण जनसंपर्क, जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता, लोकाभिमुख कार्यशैली आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदान या बळावर महेश इंगळे यांनी नागरिकांच्या मनात विश्वासाचे अढळ स्थान निर्माण केले आहे. सलग पाचव्यांदा मिळालेला विजय हा त्यांच्या कार्यकर्तृत्वावर जनतेने उमटविलेला विश्वासाचा शिक्काच असल्याची भावना व्यक्त करीत पत्रकार मोरजकर यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
यावेळी पत्रकार नीलेश मोरजकर यांनी कोकणभूमीचे निसर्गवैभव, ऐतिहासिक वारसा आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा यांची ओळख करून देत महेश इंगळे यांना बांदा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भेटीचे सस्नेह निमंत्रण दिले. कोकणच्या निसर्गरम्य भूमीला भेट देण्याबाबत इंगळे यांनी सकारात्मक भावना व्यक्त करीत या निमंत्रणाचा आनंदाने स्वीकार केला.
सत्काराला उत्तर देताना महेश इंगळे यांनीही पत्रकार नीलेश मोरजकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचे पवित्र कृपावस्त्र आणि प्रसाद देऊन सन्मान केला. भक्तीच्या पवित्र वातावरणात परस्परांचा आदर, आपुलकी आणि सामाजिक स्नेहभाव व्यक्त करणारा हा क्षण उपस्थितांसाठी विशेष आनंददायी ठरला.
यावेळी शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख रियाज खान, ओंकार फाऊंडेशनचे अध्यक्ष गुणेश गवस, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान काळसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थांच्या चरणी लाभलेला आशीर्वाद, कार्यकर्तृत्वाचा झालेला गौरव आणि कोकण-अक्कलकोटमधील स्नेहबंधांची वीण अधिक घट्ट करणारी ही सदिच्छा भेट धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक सौहार्दाचा सुंदर आविष्कार ठरली.



