सावंतवाडी : नरक चतुर्दशीच्या मंगल पूर्वसंध्येला कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगाव येथे दरवर्षीप्रमाणे दिवाळी अंक प्रदर्शनाचा सोहळा मोठ्या उत्साहात, आनंदात आणि साहित्यप्रेमाने संपन्न झाला.
यंदाचे प्रदर्शन म्हणजे केवळ पुस्तकांचे प्रदर्शन नव्हते, तर मळगावच्या लोकांची दिवाळी होती. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ वाचकांपर्यंत, महिला, युवक, शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी – सर्व वयोगटातील लोकांनी कुटुंबासह आवर्जून उपस्थिती लावली. दिवाळी अंक चाळत, एकमेकांना शुभेच्छा देत, वाचन मंदिराचे अंगण माणसांच्या गर्दीने आणि हास्याने फुलून गेले. हातात दिवाळी अंक घेतलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर निर्मळ आनंद झळकत होता.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक भरत गावडे उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना अत्यंत मोलाचे, अंतर्मुख करणारे आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ग्रंथ हाच खरा मित्र, वाचन हेच खरे धन, हा विचार त्यांनी आपल्या शब्दांतून सर्वांच्या मनात रुजवला.

यावेळी संचालक मंडळाचे अध्यक्ष श्री. महेश खानोलकर, उपाध्यक्ष श्री. बाबली नार्वेकर, कार्यवाह सौ. स्नेहा महेश खानोलकर, संचालक श्री. चंद्रकांत जाधव, श्री. शांताराम गवंडे, श्री. रितेश राऊळ यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित होते.
ग्रंथ प्रदर्शनानंतर मुंबई येथील श्री. घनश्याम डांगरे व श्री. संग्राम डांगरे यांनी प्रेमपूर्वक सदिच्छा भेट देऊन या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. मळगावसारख्या गावात लोकांनी वाचन संस्कृती अशी जपली आहे, हे पाहून खरोखरच अभिमान वाटतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी ग्रंथपाल श्री. आनंद देवळी, लिपिक सौ. देवयानी मळगावकर, कर्मचारी श्री. सुभाष तोरस्कर यांनी अत्यंत विनम्रपणे सर्व वाचकांचे स्वागत केले. अन्य वाचक व दिवाळी अंकांचे चाहते यांनी ग्रंथ प्रदर्शनास भेट देऊन प्रदर्शनाचे कौतुक केले व त्याचे महत्त्व विशद केले.
वाचकांचा हा सहभाग, त्यांचा उत्साह आणि त्यांचे प्रेम हेच वाचन मंदिराचे खरे वैभव आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



