… आणि नरेंद्र कृतकृत्य झाला !
त्याच्या कुशीत विसावलेली सुंदरवाडी तुतारीच्या निनादाने पुलकित होताना तो पाहत होता. विस्तीर्ण पसरलेल्या तलावाचे तरंग रोमांचित होताना पाहत होता. मातीचा कण-कणसुद्धा साहित्याचा सुगंध टिपत असलेला पाहत होता. म्हणूनच, तो धन्य झाला.
संस्थानकालीन राजधानी अर्थात सावंतवाडीत साहित्यमेळा झाला. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकणच्या हातांना लिहीते करण्यासाठी, लिहित्या हातांना बळ देण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात ‘कोमसाप’ ची स्थापना केली. या संस्थेचा वृक्ष त्याच्या विविध शाखांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पसरला आहे. संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाखेने जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन सावंतवाडीत अर्थात पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज साहित्यनगरीत ठरवून ‘यजमानपद’ सावंतवाडी तालुका शाखेस सुपूर्द केले. या शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ते आनंदाने स्वीकारले. आणि आज तो ‘सोनियाचा दिन’ उगवला.



वयाच्या ९४ व्या वर्षी कथा, कादंबरी, काव्य, ललित, प्रवासवर्णने, नाटके अशा साहित्याच्या सर्व विभागांमध्ये मनमुराद लिहीते राहिलेले पद्मश्री मधु मंगेश कर्णिक व नाट्याच्या प्रांतात स्वच्छंदी विहार करून नाट्यरसिकांच्या मनावर गारुड करून राहिलेल्या ‘वस्त्रहरण’ चे लेखक प्रा. गंगाराम गवाणकर यांची उपस्थिती असणार, हे साहित्यप्रेमींसाठीचे मोठे आकर्षण , आणि त्यांना समोरून डोळे भरून पाहण्यासाठीचे कुतूहल होते. शरीरस्वास्थ्यामुळे मधुभाई कर्णिक संमेलनास येऊ शकले नाहीत.. पण मनाने मात्र ते इथेच होते.

हे शहर पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज साहित्यनगरी झाले होते. जवळपास सात शतके येथील प्रजेचे उदरभरण व रक्षण केलेल्या या ‘रामराज्या’ च्या राजेंचे नाव या स्थळास दिले गेले. सावंतवाडीतील सुप्रसिद्ध साहित्यिक विद्याधर भागवत यांचे नाव या व्यासपीठास दिले गेले. साहित्यिक जयवंत दळवी सांस्कृतिक मंचावर परिसंवाद रंगला. या साहित्यिकांनी सावंतवाडीतील साहित्य क्षेत्रास अत्युच्च उंचीवर नेले आहे.
कवी केशवसुत अर्थात कृष्णाजी केशव दामले यांच्या नावे सावंतवाडीत ‘केशवसुत कट्टा’ आहे. येथूनच भरलेला साहित्यकुंभ ग्रंथांच्या सोबतीने पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज साहित्यनगरीपर्यंत नेण्यात आला. सावंतवाडीतील हे मोत्याचे कोंदण मनाला उभारी देणारेच असल्याचा ‘नरेंद्र’चा विश्वास क्षणभर दृढ झाला.
संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गातील ग्रंथालयांच्या स्थितीवर भाष्य केले. कित्येक वर्षांची जुनी पुस्तके सांभाळून ठेवणे फार अवघड असते. शिवाय, वाचकास ग्रंथालयात जावे असे वाटण्यासाठी ग्रंथालयेसुद्धा आकर्षकच असायला हवीत, हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. कोकणात ‘मालवणी भवन’ व्हायला हवे, असा विचार त्यांनी या व्यासपीठावर मांडला. या क्षेत्रातील कोणतीही कामे असल्यास ती आपल्याकडून करून घ्या, असेही आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. यामुळे साहित्यप्रेमींच्या मनात आशेचा किरण उगवला.
‘वस्त्रहरण’ चे लेखक, नाटककार गंगाराम गवाणकर यांनी ‘वस्त्रहरण’ ची लंडनवारी करताना विमानप्रवासात आलेले खरेखुरे अनुभव सांगितले. ते विनोद ऐकताना सभागृहात अक्षरश: हास्याचे फवारेच उडत होते जणू !
कोमसापचे कार्याध्यक्ष, लेखक प्रदीप ढवळ यांच्या मुलाखतीतून छत्रपती शिवराय, जिवा महाला ही व्यक्तिमत्वे डोळ्यांसमोर उभी राहिली. सुप्रसिद्ध लेखक जयवंत दळवी यांच्यावर झालेल्या परिसंवादातून जयवंत दळवींच्या लेखनातील- स्वभावातील अज्ञात असलेले अनेक पैलू उलगडले. निमंत्रित कवी- कवयित्रींच्या ‘तुतारी’ कविसंमेलनाने या साहित्य संमेलनाची रंगत वाढवली. अर्थातच, हे संमेलन उत्तरोत्तर बहारदार होत गेले.
आपल्या मातीतील थोर लेखकांची असामान्य प्रतिभा, विद्वत्ता या साऱ्याचेच या संमेलनात स्मरण झाले. अर्थात, आता मागील पिढीने दिलेले पुढची पिढी काळजीपूर्वक पुढे नेत आहे, हे मोठे समाधान आहे.
असेच येथील लिहिते हात वाढोत. त्या सर्व करांना बळ मिळो, लेखन सकस होवो, आणि पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज साहित्यनगरीचा साहित्यकुंभ चिरंतन राहो ! चिरंतन राहो!!
सौ. मंगल नाईक-जोशी, सावंतवाडी


