सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषदेचे साहित्य संमेलन सावंतवाडी येथे संपन्न झाले. यातील सर्वात सुंदर सादरीकरण झाले ते कवी संमेलनात सहभागी झालेल्या कवी आणि कवयित्रींच्या ‘तुतारी’ या कवी संमेलनात. या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, कवी आनंद वैद्य होते तर विशेष उपस्थिती ‘वस्त्रहरण’कार लेखक गंगाराम गवाणकर यांची होती.
साहित्य संमेलनाच्या अंतिम सत्रात संपन्न झालेल्या या दर्जेदार कवी संमेलनात काव्य प्रतिभांनी ओतप्रोत रचना सादर करण्यात आल्या. सर्वप्रथम या कवी संमेलनाचे निवेदक कवी दीपक पटेकर यांनी ज्येष्ठ कविवर्य वसंत सावंत यांच्या ‘अशा लाल मातीत जन्मास यावे.!’ या काव्य रचनेने सुरुवात केली. या कवी संमेलनात सावंतवाडी, कुडाळ, कणकवली व मालवण या चारही कोकण मराठी साहित्य परिषदेच्या तालुका शाखेतील सदस्य कवींनी सहभाग नोंदविला. सुप्रसिद्ध मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांनी ‘कोकणी माणसा आता तरी उठ रे.!’ ही वास्तवता दर्शविणारी कविता सादर करून प्रारंभीच कवी संमेलनात रंग भरायला सुरुवात केली. त्यानंतर ॲड. नकुल पार्सेकर यांनी आजच्या परिस्थितीवर परखड भाष्य करणारी ‘राजे जमल्यास माफ करा.!’ ही कविता सादर करून आजच्या राजकीय व्यवस्थेचे चित्र उभे करत शिवरायांच्या स्वराज्याची आजच्या स्वार्थी राजकारणात कशा पद्धतीने पायमल्ली होत आहे, हे स्पष्ट केले.

त्यानंतर ज्येष्ठ कवयित्री सुनंदा कांबळे यांनी अस्सल मालवणी बोली भाषेतील विडंबनात्मक काव्य ‘बाराच्या भावात…’ सादर करून रसिक श्रोत्यांना मनसोक्त हसविले. उत्कृष्ट गझलकार एकनाथ गायकवाड यांनी ‘ठेचाळतो आहे’ ही गझल सादर करून आपल्या वेगळ्या काव्य शैलीचा आनंद रसिकांना दिला. तर विजय कुमार शिंदे यांनी ‘ती गेल्यावर’ ही कविता सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
कवयित्री डॉ. दर्शना कोलते यांनी आधुनिक काळातील विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित ‘गुगल आणि गुरु’ या काव्यरचना सादरीकरणातून गुरूंचे आजच्या काळातही किती महत्त्व आहे, हे स्पष्ट केले. डॉ. दिपाली काजरेकर यांनी नारी शक्तीची महिमा ‘आग आहे मी आग..!’ या कवितेतून सादर केली तर अभिजात दर्जा मिळालेल्या मराठी भाषेवर भाष्य करणारी ‘माझी मराठी’ ही दर्जेदार कविता कवी स्वप्निल वेंगुर्लेकर यांनी सादर केली. ज्येष्ठ कवी प्रसाद खानोलकर यांनी ‘का’ ही विता ही एक आगळीवेगळी कविता सादर करून कवी संमेलन वेगळ्या उंचीवर नेले.
प्रेरणादायी वक्ते प्रा. रुपेश पाटील यांनी आजच्या भ्रष्टाचारी राजकीय व्यवस्थेत आणि ढेपाळलेल्या लोकशाहीत रोजंदारीवर जगणाऱ्या माऊलीचे दृश्य ‘माय’ या कवितेतून उभे करून रसिकांना अंतर्मुख केले. तन्वी परब या नवोदित कवयित्रीने सादर केलेली ‘सुरंगीचो वळेसार’ ही कविता तर खूपच आगळीवेगळी आणि मनाचा भाव वेधणारी ठरली. अक्षता गावडे हिने ‘आणि काय हवे?’ ही काव्यरचना सादर केली. सावंतवाडी येथील कवयित्री मंगल नाईक – जोशी यांनी ‘खरे सांग विठोबा.!’ ही दर्जेदार काव्य कृती सादर करून कवी संमेलनात रंगत आणली.
कवयित्री कल्पना मलये यांनी ‘नथीचा आकडा’ या काव्यातून महिलांचा पूर्वीच्या काळात असलेला सामाजिक वावर विषद केला तर राजेश रेगे यांनी अंतराळातून नुकत्याच परतलेल्या सुनीता विल्यम्स यांच्यावर सादर केलेली कविता श्रोत्यांना खूपच भावली. प्रा. रीमा भोसले यांनी ‘काळाच्या ओघात’ आणि युवा कवी सिद्धेश खटावकर यांनी ‘मी आणि माझे भाळणे’ या काव्यासही प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळाली. तसेच ऋतुजा सावंत भोसले यांनी सादर केलेली ‘उंबरठ्याचे माप’ या काव्यपंक्तीतून पूर्वीची महिला आपल्या जीवनाविषयी बोलत असल्याची कल्पना मांडली.
या कवी संमेलनात ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांनीही आपल्या स्वरचित कविता सादर करत आपल्या अनोख्या विनोदी शैलीत काव्य रसिकांना मोहित केले.
कवी संमेलनाचे अध्यक्ष आनंद वैद्य म्हणाले, कवितेत कमी शब्दात मोठा आणि गहन अर्थ मांडता आला पाहिजे. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय मांडता आला पाहिजे. जी कविता कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ विशद करते ती रसिकांना जास्त आवडत असते. असे सांगत त्यांनी देखील एक लघु काव्य सादर केले.
या निमंत्रितांच्या कवी संमेलनात निवेदक दीपक पटेकर यांनी सादर होणाऱ्या कवितांच्या आशयावर चार ओळीत केलेल्या काव्यपंक्ती आणि त्यानुसार झालेले निवेदन यामुळे अत्यंत दर्जेदार कवी संमेलन संपन्न झाले.
दरम्यान, आगामी काळातही अशीच दर्जेदार काव्य मेजवानी सिंधुदुर्गवासीयांना मिळेल, असा आशावाद जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी व्यक्त केला. शेवटी सर्व सहभागी कवींना कवी संमेलनाचे अध्यक्ष आनंद वैद्य, नाटककार गंगाराम गवाणकर व जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.


