सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे गावचे सुपुत्र श्री. नित्यानंद गुणाजी सावंत हे सैन्यदलात ‘सुभेदार मेजर’ या पदावरून आज दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सिकंदराबाद (आंध्रप्रदेश) येथून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी तब्बल 33 वर्ष एक महिना देशाची सेवा केली आहे.
सुभेदार मेजर सावंत यांची पुणे येथून सैन्यदलात भरती झाली. पुढे त्यांना इले निक्स मॅकॅनिकल इंजिनिअर्स कोर (EME कोर) मधील ट्रेनिंगसाठी भोपाळ (मध्यप्रदेश) येथे २९/०२/१९९२ साली पाठविण्यात आले. येथून त्यांच्या शिपाई पदावरून देशसेवेला सुरुवात झाली. पुढे नायक, हवालदार नायक सुभेदार, सुभेदार, सुभेदार मेजर या पदापर्यंत ईच्छाशक्ती, घाडस मेहनतीच्या जोरावर मजल मारली व सुभेदार मेजर पदावरून ते आज सेवानिवृत्त होत आहेत.
‘या’ ठिकाणी सावंत यांनी बजावली कर्तव्ये –
आपल्या सैनिकी सेवेत सावंत यांनी भोपाळ (मध्यप्रदेश), हिस्सार (हरियाणा), रांची (झारखंड), पठाणकोट (पंजाब), पुणे (महाराष्ट्र), भूतान देश, चंदीगड (पंजाब), लेह (जम्मू काश्मिर), नवगांव (मध्यप्रदेश), जोधपूर (राजस्थान), दिमापूर (नागालँड), अमृतसर (पंजाब), जम्मू काश्मिर, सिकंदराबाद (आंध्रप्रदेश) या ठिकाणी देशसेवा केली आहे. देशाच्या या राज्यांमध्ये जाऊन त्यांनी देशसेवा केली आहे. दिनांक २७/०६/२००४ ते १४/१२/२००६ जवळपास अडीच वर्ष कालावधीसाठी भारत देशाच्या सैन्य दलामधील तुकडीमधून भूतान देशाच्या सैन्याला मार्गदर्शन करण्यात सुभेदार मेजर यावेत यांची निवड झाली होती. तेथेही त्यांनी चांगली कामगिरी बजावली होती.
सुभेदार मेजर नित्यानंद सावंत यांचे प्राथमिक शिक्षण सावंतवाडी तालुक्यातील शाळा शारदा विद्या मंदिर तळवडे नंबर ४ येथे तर माध्यमिक शिक्षण श्री जनता विद्यालय, तळवडे येथे झाले. तेथुन ते पुढे मोठ्या भावाकडे गेले, पुढील शिक्षण व सैन्य दलात काम करण्याची आवड असल्याने एका अॅकॅडेमीत त्यांनी प्रवेश घेतला. दरम्यानच्या काळात त्यांना पुणे येथील सैन्यातील सावंत नामक व्यक्तींचे खूपच मार्गदर्शन झाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे वडिलांच्या आशीर्वादाने, मोठ्या भावाच्या सहकार्याने आपण सैन्यदलात भरती झालो व 33 वर्ष देशसेवा करु शकलो, असे ते आवर्जून सांगतात.
मी सैन्य दलात राहून सुभेदार मेजर पदापर्यंत जाऊन जो मान सन्मान मिळविला त्याबद्दल मला आनंद मिळाला. पण ज्यांनी मला घडविले, मार्गदर्शन केले ते दोन वेळेला शासनाचा आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळविणारे माझे वडील गुणाजी सावंत आज हयात नाहीत, याचे दुःख मला यावेळी होत असल्याचे सुभेदार मेजर सावंत यांनी यावेळी बोलून दाखविले.
त्यांचे बंधु सुनील गुणाजी सावंत हे सिंधुदुर्ग बँकेत सेवा देत असून सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असतो.
सुभेदार मेजर नित्यानंद सावंत यांच्या या देशसेवेला ‘सत्यार्थ’ न्यूज परिवाराकडून सलाम व भावी वाटचालीस मनस्वी शुभकामना..!
ADVT –




