पुणे : उड्डाणपुलाच्या कामासाठी रेल्वे ट्रॅकवरील खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून ९ वर्षीय मुलाचा बुडून मुत्यू झाला आहे. क्रिश सुभाष अंगरकर (वय-९, रा. खान रोड, गुरुद्वाराजवळील आर्मी सर्व्हट क्वार्टर, पुणे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना शनिवार (दि.२९) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराचा निष्काळजीपणा समोर आला असून, कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिश अंगरकर हा त्याच्या मोठ्या भावासह घोरपडी येथील स्वामी विवेकानंद शाळेत इयत्ता चौथीत शिकत होता. शुक्रवारी नेहमीप्रमाणे ते दोघे भाऊ सकाळी १० वाजताच्या सुमारास शाळेत गेले होते. सायंकाळी मात्र मोठ्या भावाला क्रिश शाळेत दिसला नाही. क्रिश घरी गेला असेल असे समजून मोठा भाऊ एकटाच घरी आला. मात्र क्रिश घरी नव्हताच. रात्र होऊनही तो घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी वानवडी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
शाळेच्या रस्त्यावरच उड्डाणपुलाचे खांब उभारण्यासाठी १० फूट खोल खड्डे खोदण्यात आले असून त्यात ६ फुटांपर्यंत पाणी साचले होते. शाळेतून येताना याच खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून क्रिशचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी त्या पाण्यावर शाळेची बॅग तरंगताना दिसली. नागरिकांना शंका आल्याने त्यांनी शेजारीच असलेल्या पोलिस चौकीत घटना कळवली. पोलिसांनी अग्निशमन दलाला कळवले. अग्निशामक दलाने खड्ड्यातील पाणी पंपाद्वारे उपसले. त्यानंतर दीड फुटावर मृतदेह आढळून आला.


