नवी दिल्ली : इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गुरुवारी गाझा पट्टीत धुमाकूळ घातला. इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात गाझामध्ये 100 जण ठार झाले आहेत. यात उत्तर गाझामधील एका शाळेवर झालेल्या हवाई हल्ल्यात 33 जणांचा मृत्यू तर 70 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती पॅलेस्टाइनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गाझाच्या नागरी संरक्षण एजन्सीने सांगितले की, युद्धामुळे विस्थापित झालेल्या लोकांसाठी निवारा म्हणून काम करणाऱ्या शाळेवर इस्रायलने गुरुवारी केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 25 जण ठार झाले आहे. यासंदर्भातलं वृत्त ‘AFT वृत्तसंस्थे’नं दिलं आहे.
14 मुले आणि 5 महिलांचे मृतदेह सापडले –
पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते जहेर अल-वाहिदी यांनी सांगितले की, गाझा शहरातील तुफा येथील एका शाळेतून 14 मुले आणि 5 महिलांचे मृतदेह सापडले आहेत, परंतु जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. अहली रुग्णालयातील नोंदींचा हवाला देत त्यांनी सांगितले की, जवळच्या हिजय्या भागात घरांवर झालेल्या हल्ल्यात इतर 30 हून अधिक गाझान नागरिक ठार झाले.
उत्तर गाझामधील लोकांना माघार घेण्यास सांगितले –
इस्रायलच्या लष्कराने गाझा सिटी परिसरातील हमासच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरवर हल्ला केल्याचे म्हटले आहे. नागरिकांचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. उत्तर गाझाच्या काही भागात राहणाऱ्या नागरिकांना लष्कराने गुरुवारी गाझा शहराच्या पश्चिम भागात आश्रय घेण्याचे आदेश दिले.
या भागात अतिरेकी बळाचा वापर करून काम करण्याची योजना आखल्याचा इशाराही त्यांनी दिला. लक्ष्यभागातून पळून गेलेले अनेक पॅलेस्टिनी पायी निघाले, काहींनी आपले सामान पाठीवर घेतले, तर काहींनी खेचरगाड्यांचा वापर केला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बुधवारी सांगितले की, इस्रायल गाझामध्ये नवीन सुरक्षा कॉरिडॉर स्थापन करत आहे.


