मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन झाले आहे. डॉ. उजवणे यांनी वयाच्या 62 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं कला विश्वावर शोककळा पसरली आहे. संपूर्ण कलाविश्व ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाचा शोक व्यक्त करत असताना, मराठी मनोरंजन विश्वावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनानं एक नाट्य, चित्रपट क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
आज मीरारोड याठिकाणी असणाऱ्या एका खासजी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. उजवणे यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. विलास उजवणे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने अमीट छाप सोडली होती. त्यांच्या सहजसुंदर अभिनय शैलीमुळे ते प्रेक्षकांच्या आवडीचे कलाकार बनले होते. सकारात्मक भूमिकांसह त्यांच्या खलनायकी भूमिकाही विशेष गाजल्या होत्या.
डॉ. विलास उजवणे 62 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. ‘वादळवाट’, ‘चार दिवस सासूचे’, ‘दामिनी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून ते घराघरांत पोहोचले. साधारण सात ते आठ वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. या आजाराचा सामना करताना त्यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलं होतं. ब्रेन स्ट्रोकशी झुंज देत असतानाच विलास उजवणे यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला होता. त्यातच त्यांना कावीळची देखील लागण झाली आहे. या सगळ्या उपचारांसाठी त्यांनी आपली आयुष्यभराची मिळकत खर्च केली होती. आजारपणात त्यांच्याकडे कामंही नव्हतं. मात्र, या कठीण काळातून ते बाहेर पडले. मोठ्या धीराने त्यांनी या गंभीर आजाराशी लढा दिला आणि मनोरंजनविश्वात पुन्हा कमबॅक सुद्धा केलं होतं. ‘कुलस्वामिनी’, ‘२६ नोव्हेंबर’ सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.
डॉ. विलास उजवणे यांचा जन्म 16 डिसेंबर 1964 साली नागपुरात झाला. शालेय जीवनापासून त्यांना अभिनयाची आवड होती. ‘अन्यायाला फुटती शिंग’ या बालनाटय़ातून त्यांचे रंगभूमीवर पदार्पण झाले. आपली अभिनयाची आवड जपून त्यांनी गव्हर्नमेंट आयुर्वेदिक काॅलेजमधून वैद्यकीय पदवी घेतली. ‘चाणक्य’ ही त्यांची पहिली मालिका होती. ‘नाती अनोळखी’ या नाटकातील भूमिकेमुळे त्यांना ओळख मिळाली. ‘जनता जनार्दन’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता…
चित्रकर्मी’ पुरस्काराने गौरव –
डॉ. विलास उजवणे यांनी आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीत त्यांनी 110 हून अधिक चित्रपट, 67 नाटक आणि तब्बल 140 मालिकांमध्ये काम केले होते. अभिनय क्षेत्रातील त्यांच्या कारकीर्दीची दखल घेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने त्यांना ‘चित्रकर्मी’ या पुरस्काराने सन्मानित केले होते..
कला विश्वातील एक अत्यंत दिलदार व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड : खासदार अमोल कोल्हे.
अभिनय क्षेत्रात सुरुवातीच्या खडतर काळात मला अतिशय आपुलकीने मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावणारी आहे. समोर आलेल्या आजारांचा त्यांनी अतिशय कणखरपणे सामना केला, या लढ्यात त्यांच्या पत्नी अंजली वहिनी यांनीही त्यांना खंबीर साथ दिली. ही झुंज अखेर थांबल्याने कला विश्वातील एक अत्यंत दिलदार व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना मिळो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.


