लखनौ : लखनौ सुपर जायंट्स संघाने मुंबई इंडियन्स विरूद्ध नाट्यमय सामन्यात अखेरच्या षटकात शानदार विजय मिळवला. लखनौने मुंबई इंडियन्सवर १२ धावांनी विजय मिळवत मोसमातील दुसरा विजय नोंदवला. लखनौसमोर मुंबई इंडियन्सचा रेकॉर्ड कायमच खराब राहिला. आवेश खानने अखेरच्या षटकात कमालीची गोलंदाजी करत मुंबईला पराभवाचा दणका दिला. लखनौ सुपर जायंट्सने रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव करून आयपीएल २०२५ मध्ये आपला दुसरा विजय नोंदवला.
प्रथम फलंदाजी करताना लखनौने मिशेल मार्श आणि एडेन मार्करम यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २० षटकांत ८ बाद २०३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल, सूर्यकुमार यादवनेही अर्धशतक ठोकले पण त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि मुंबईला निर्धारित षटकांत पाच बाद १९१ धावाच करता आल्या. मुंबईकडून सूर्यकुमारने ४३ चेंडूत नऊ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६७ धावा केल्या.
मुंबई इंडियन्सला अखेरच्या षटकात २२ धावांची गरज होती. आवेश खानकडे गोलंदाजी करण्याची जबाबदारी आली. आवेशच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने षटकार लगावला. यानंतर हार्दिकने २ धावा घेतल्या. तिस-या चेंडूवर हार्दिकने धाव घेण्यास नकार दिला. चौथ्या चेंडूवर मोठा फटका मारायला हार्दिक चुकला. पाचव्या चेंडूवर हार्दिकने एक धाव घेतली आणि सहाव्या चेंडूवर धाव मिळाली नाही. पहिल्या चेंडूवर षटकार बसलेला असतानाही आवेश खानने यॉर्कर टाकत उत्कृष्ट गोलंदाजी करत हार्दिकला रोखले.
अखेरच्या षटकांमध्ये शार्दुल ठाकूर आणि आवेश खान यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौने मुंबईला २०४ धावांचे लक्ष्य गाठण्यापासून रोखले. याआधी मिचेल मार्श आणि एडन मारक्रम यांनी लखनौकडून उत्कृष्ट अर्धशतके झळकावली होती तर मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाज दिग्वेश राठीने मुंबईच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवले.
लखनौने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारली. पुन्हा एकदा सलामीवीर मिचेल मार्शने संघासाठी स्फोटक खेळी खेळली आणि अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक झळकावले. मार्शने ३१ चेंडूत ६० धावा केल्या. एडन मारक्रमने अर्धशतक झळकावले. मात्र, निकोलस पूरन अपयशी ठरला, तर कर्णधार पंत सलग चौथ्या सामन्यात फ्लॉप ठरला.
लक्ष्याचा पाठलाग करताना, मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. कारण त्यांनी १७ धावांच्या आत विल जॅक्स आणि रायन रिकलटन यांच्या विकेट्स गमावल्या. यानंतर, सूर्यकुमार आणि नमन धीर यांनी डावाची सूत्रे हाती घेतली आणि शानदार फलंदाजी केली आणि तिसऱ्या विकेट्ससाठी ६९ धावांची भागीदारी केली. परंतु, नमन धीरचे अर्धशतक हुकला आणि २४ चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांसह ४६ धावा काढून बाद झाला. मुंबईने तिलक वर्माला प्रभावशाली खेळाडू म्हणून संघात आणले ज्यांनी सूर्याला चांगली साथ दिली.
सूर्यकुमारने ३१ चेंडूत अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर आक्रमक खेळ सुरूच ठेवला. सूर्यकुमारला आवेश खानने बाद केले. सूर्यकुमार पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या क्रीजवर आला. शेवटच्या षटकाच्या अगदी आधी, तिलक वर्मा २५ धावा काढून रिटायर्ड आऊट झाला आणि त्याच्या जागी मिशेल सँटनर क्रीजवर आला. शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी २२ धावांची आवश्यकता होती.
हार्दिक पंड्याने आवेश खानच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला, पण यानंतर आवेश धावांवर अंकुश लावत लक्ष्याचा बचाव करण्यात यशस्वी झाला. त्याने या षटकात अवघ्या १० धावा खर्च केल्या. हार्दिकने १६ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकारासह २८ धावा केल्या, तर सँटनरनेही दोन धावा काढल्यानंतर नाबाद राहिला. लखनौकडून शार्दुल ठाकूर, आकाश दीप, आवेश खान आणि दिग्वेश सिंग राठी यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली. या सामन्यासह मुंबईचा चार सामन्यांपैकी तिसरा पराभव ठरला. त्याचबरोबर लखनौ सुपरजायंट्स चार सामन्यातील दुसरा विजय ठरला.