Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

“मालवणचो कट्टो प्रतिष्ठान” मुंबई संस्थेचे आदर्श दातृत्व.! ; नाग्या महादू निवासी वसतिगृह वेताळबांबर्डेला संगणक संच भेट.

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुले मुंबईत गेली, चाकरमानी झाली परंतु आपल्या गावाला आणि घरच्या संस्काराला विसरली नाहीत. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कोकणातील मुलांनी “सहकारातून सदाचार” हे ब्रीद अंगिकारून सुरू केलेला “मालवणचो कट्टो प्रतिष्ठान (रजि) मुंबई हा समूह..! शनिवार दिनांक १९ एप्रिल रोजी याच मालवणचो कट्टो प्रतिष्ठान समूहाने कातकरी समाजातील मुलांसाठी उदय अहिर चालवीत असलेल्या वेताळ बांबर्डे येथील नाग्या महादू निवासी वसतिगृहाला संगणक संच आणि गरजेच्या वस्तू भेट देऊन मोलाची मदत केली आणि खऱ्या अर्थाने समूह कसा असावा याचे जिवंत उदाहरण डोळ्यासमोर ठेवले. यावेळी मालवणचो कट्टो प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर कांदळकर उपस्थित राहू शकले नाहीत परंतु संगणक संच भेट देण्यासाठी मुंबई येथून प्रतिष्ठानच्या सदस्या सुवर्णा वायंगणकर आणि सावंतवाडी येथील सदस्य दीपक पटेकर, पिंगुळी येथील परेश परब व सुवर्णा वायंगणकर यांच्या दोन भगिनी उपस्थित होत्या.


कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे येथे उदय अहिर हे समाजापासून कोसो मैल दूर असलेल्या कातकरी समाजातील मुलांना सर्वसामान्य माणसांप्रमाणे जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करताना त्यांना राहण्यासाठी वसतिगृह, पोटाची भूक भागविण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा अशा प्राथमिक गरजा पूर्ण करत शिक्षण देऊन सुशिक्षित, संस्कार देऊन सुसंस्कारित करून माणसात आणण्याचे अतुलनीय काम करत आहेत. आई वडिलांसोबत जंगलात शिकार करून जगणारा हा समाज आज इतर सुविधांपासून उपेक्षितच राहिला आहे. सरकारने या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असताना त्यांची कोणीही दखल घेत नाही. जे काम सरकारने करायचे ते काम उदय अहिर यांनी सुरू करून या समाजाला सर्वसामान्य लोकांप्रमाणे मुख्य प्रवाहात आणण्याचे अशक्य वाटत असलेले प्रयत्न शक्य करून दाखवले आहेत. त्यांची कातकरी समाजातील मुलांसाठी सुरू असलेली धडपड पाहून मालवणचो कट्टो प्रतिष्ठान(रजि.) मुंबई समूहाने आपणही या समाजकार्यात खारीचा वाटा उचलावा म्हणून या कातकरी मुलांना इतर मुलांप्रमाणे शैक्षणिक मूलभूत गरज असणारा संगणक संच संस्थेला भेट देत कातकरी समाजातील मुलांची देखील संगणक शिकण्याची इच्छा पूर्ण केली आहे. त्याचबरोबर वसतिगृहात राहणाऱ्या कातकरी समाजातील मुलांसाठी प्रतिष्ठानच्यावतीने खाऊ, कपडे देखील देण्यात आले. प्रतिष्ठानचे सावंतवाडीचे सदस्य दीपक पटेकर यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वसतिगृहातील मुलांसाठी तांदूळ देऊन सहकार्य केलं. त्यामुळे सर्वच स्तरातून मालवणचो कट्टो प्रतिष्ठानचे अभिनंदन केले जात आहे. नाग्या महादू निवासी वसतिगृहच्या वतीने उदय अहिर यांनी संस्थेच्या मदतीसाठी मालवणचो कट्टो प्रतिष्ठानचे आभार मानले आहेत.


यावेळी प्रतिष्ठानच्या सदस्या सुवर्णा वायंगणकर यांनी मुंबई येथून येऊन या उपक्रमाच्या पूर्ततेसाठी अमूल्य असे योगदान दिले. त्यांनी मुलांना विविध विषयांवर प्रश्न विचारून मुलांच्या हुशारीची जणू परीक्षाच घेतली, त्याला मुलांनी देखील अचूक उत्तरे देत आपल्या हुशारीची चुणूक दाखवली. बहुतांश मुलांनी आपल्याला सैन्यात, पोलिसात जायचे असल्याचे सांगितले तर काहींनी डॉक्टर, इंजिनियर होण्याचे स्वप्न देखील बोलून दाखवले. मुलांमधील वाढता उत्साह आणि आत्मविश्वास कायम टिकण्यासाठी दीपक पटेकर यांनी मुलांना सैनिक व पोलिस भरतीसाठी आवश्यक असलेला अभ्यास आणि शारीरिक तंदुरुस्ती याबाबत अमूल्य असे मार्गदर्शन केले. यावेळी कातकरी समाजातील उपस्थित असलेल्या ६५ मुलांनी एका सुरात
“किती सुंदर सुंदर हे…जग ज्याने निर्मियले
त्या परमेशाला रे… वाहूया शब्दफुले…”
ही प्रार्थना गायन करून वातावरण प्रसन्न बनविले. प्रतिष्ठानने दिलेला संगणक संच जोडणी करण्याचे काम देखील कातकरी समाजातील मुलांनीच केले हे विशेष.. तिथे असलेल्या मुलगे व मुलींसाठी नवीन स्लॅबची इमारत बांधून वेगवेगळे बेड देऊन केलेली राहण्याची व्यवस्था पाहून प्रतिष्ठानच्या सदस्यांनी संस्थेचे कौतुक केले. यावेळी उदय अहिर, संस्थेचे महिला सहकारी उपस्थित होते.

ADVT – 

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles