भावतरंग
…..
साईबाबांची शिकवण!
…..
मी बहुधा त्यावेळी शाळेत देखील जात नव्हतो तेव्हा गावातील तंबूत शिर्डीच्या साईबाबांचा सिनेमा मी पाहिला होता. त्यांच्या चमत्कारांच्या कथांमुळे तो मला खूप रोचक वाटला होता. पुढे कित्येक दिवस माझ्या मनात मी त्या सिनेमातील दृश्यांची उजळणी केली होती. तो काळच असा होता की जेव्हा भराभर काही बदलत नव्हते. जीवनात संथपणा होता आणि त्यामुळे अनुभवलेल्या गोष्टींचा आस्वाद घ्यायला बराच निवांतपणा मिळत असे.
चमत्कारांमुळे संतांच्या गोष्टींना आकर्षकता येत असली तरी त्यांच्या संतत्वाचे कारण चमत्कार नसते. त्यांचा उपदेश आणि त्यांचे मुल्यनिष्ठेने जगणे, हेच त्यांच्या संतत्वाचे कारण असते. मुळात जीवनात कितीही समस्या आल्या तरी जी मोजकी माणसे मुल्यनिष्ठेने जगू शकतात, तिच संत होतात.
साईबाबांचा सिनेमा पाहून घरी आल्यावर सिनेमात पाहिलेले चमत्कार मी सांगत असताना बाबांनी विचारले होते, ‘साईबाबा कुठे राहात ते पाहीलेस का?’ साईबाबा पडक्या मशिदीत रहात होते आणि तिला द्वारकामाई म्हणत होते. पण बाबांनी विचारलेल्या या प्रश्नाचे मर्म त्यावेळी मला समजले नाही. त्यानंतर असंख्यवेळा मी साईबाबांची चित्रे पाहिली. त्यांची बसण्याची विशिष्ट पोज आणि ‘श्रद्धा’ व ‘सबुरी’ हे शब्द नेहमीच मनात भरत राहिले. यातील सबुरी शब्दामध्ये किती व्यापक अर्थ भरला आहे, हे मला मनोविकारशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यास करताना समजले.
आमच्या मानसशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात एक गंमतीशीर प्रयोग होता. हा प्रयोग वाॅल्टर मिशेल नावाच्या शास्त्रज्ञाने १९६० च्या दशकात स्टॅन्डफर्ड विद्यापीठात केला होता. त्याने काय केले? विद्यापीठाच्या परीसरात राहणाऱ्या स्टाफची (प्राध्यापक, कारकून, शिपाई वगैरे यांची) लहान मुले गोळा केली. कोणत्या वयातील? शाळापूर्व वयातील म्हणजे सुमारे चार वर्षांची. त्यांच्या पुढ्यात एकेका मुलासमोर त्याने एकेक बशी ठेवून त्यात एकेक मिठाईचा तुकडा ठेवला. आणि तो म्हणाला, ‘जर तुम्ही मी बाहेर जाऊन येईपर्यंत तुमच्या पुढ्यातील मिठाईला हात न लावता थांबून राहीलात तर मी तुम्हाला या मिठाईचा आणखी एक तुकडा देईन. पण तुम्ही कोणी मी परत यायच्या आधी तुमच्यासमोर बशीत ठेवलेला तुकडा खाल्लात तर तुम्हाला दुसरा तुकडा मिळणार नाही. एवढे सांगून वाॅल्टर बाहेर निघून गेला. मुलांवर लक्ष ठेवायला कोणीही माणूस तिथे नव्हता. एक लपवलेला कॅमेरा त्या मुलांचे निरीक्षण करत होता. पंधरावीस मिनीटांनी वाॅल्टर जेव्हा परत आला तेव्हा काही मुलांनी त्यांच्यासमोरील बशीतला तुकडा खाऊन टाकला होता. पण काही मुलांनी मात्र बशीतल्या तुकड्याला हात न लावता वाॅल्टर परत येण्याची वाट बघितली होती. अर्थात अशी वाट बघणे त्या चिमूरड्यांना सोपे गेले नव्हते. तो मिठाईचा तुकडा त्यांना सतत खुणावत होता. त्यांनी तो दिसू नये म्हणून आपल्याच हातांनी आपले डोळे बंद करून घेतले. लक्ष बाजूला जावे म्हणून ते स्वतःशीच बोलू लागले. गाऊ लागले. आपल्याच हातापायांचे चाळे करत वेळ काढू लागले. काहींनी तर झोपी जाण्याचाही प्रयत्न केला. वाॅल्टरने या सबुरी बाळगू शकणार्या बच्चे कंपनीला परत आल्यावर सांगितल्याप्रमाणे मिठाईचे दोन तुकडे दिले.
पण वाॅल्टरचा प्रयोग इथेच संपला नाही. इथे तो एवढेच शोधू शकला होता की काही मुलांकडे सबुरी बाळगण्याचे उपजत कौशल्य असते. त्याने या मुलांचा पुढे दहा वर्षे पाठपुरावा केला, तेव्हा त्याला आढळले की वयाच्या चौथ्या वर्षी सबुरी बाळगणाऱ्या या मुलांचा अभ्यासातील आणि इतर जीवनातील परफॉर्मन्स त्यांच्याच सोबतच्या सबुरी बाळगू न शकलेल्या मुलांपेक्षा खूपच चांगला होता. ते टेंशन आल्यास सैरभैर न होता शांतपणे विचार करुन टेंशनची परीस्थिती चांगल्या तर्हेने हाताळू शकत होते. ते आपले म्हणणे ठामपणे मांडू शकत होते. नव्याने समोर आलेल्या कामात पुढाकार घेत होते आणि ते काम झोकून देऊन पूर्ण करीत होते. कंटाळवाणा अभ्यास मध्येच सोडून देण्याची प्रवृत्ती त्यांच्यात नव्हती. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास चांगल्या तर्हेने दिसत होता.
वाॅल्टरचा प्रयोग इथेही संपला नाही. त्याने त्यांना आणखी दहा वर्षांनी म्हणजे वयाच्या पंचविशीत तपासले. आणि तिथेही ते त्यांच्यासोबतच्या लहानपणी सबुरी पाळू न शकलेल्या मुलांपेक्षा उजवे निघाले.
पण इथे तुमच्या मनात हा प्रश्न उभा राहीला असेल की आपण ज्या गुणाबाबत बोलत आहोत, तो त्या नशीबवान मुलांत उपजत होता. पण असा गुण उपजत न मिळालेल्या मुलांनी काय करायचे? प्रारब्ध म्हणून आपला चंचलपणा गुपचूप स्वीकारायचा का? अजिबात नाही! ‘सबुरी’ हा शिकता येण्यासारखा आणि शिकवता येण्यासारखा गुण आहे. मुळात हा गुण भावनिक बुद्धिमत्तेचा पायाचा दगड आहे. त्यामुळे तो जाणीवपूर्वक शिकला पाहीजे, शिकवला पाहीजे. आपल्या मुलांना ‘सबुरी’ शिकवण्यासाठी काय करता येईल? तुमच्या मुलाने कोणतीही गोष्ट मागितल्यास ती वस्तू लगेच मिळवण्याची तुमची परिस्थिती असो अगर नसो, त्याला ती वस्तू लगेच देऊ नका. त्या वस्तूची किती तातडीची आवश्यकता आहे, त्यानुसार त्यासाठी थोडा वेळ घ्या. आणि नंतरच ती वस्तू द्या. इथे एक पथ्य मात्र पाळले पाहीजे. ते म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला दिलेला शब्द पाळला पाहीजे. तुम्ही एखादी गोष्ट चार दिवसांनी देणार असे सांगीतले असेल तर ती चार दिवसांनी दिली पाहीजे. आणि दुसरे पथ्य हेदेखील पाळा की वस्तूच्या गरजेप्रमाणे किती वेळ वाट पाहू देणार याचा स्पष्ट निकष ठरवा. तो निकष तुमच्या मुलाला स्पष्टपणे कळू द्या. मुलाने मागितलेल्या काही वस्तू त्याच्यासाठी अजिबात गरजेच्या नसतील तर त्या ठामपणे नाकारा. इथेही तुमच्या नकारात सातत्य असले पाहिजे. (तुम्ही चिडलेले असताना नकार व खुश असताना होकार असे होऊ देऊ नका.)
एक पालक म्हणून तुम्हाला माझा अनुभव सांगतो. प्राथमिक शाळेत असताना एक दिवस शाळेतून आल्यावर माझी मुलगी म्हणाली, ‘बाबा, बाईंनी उद्याच अमूक वही खरेदी करुन आणायला सांगितली आहे.’ मी तिला म्हणालो, ‘अशी तातडीने वही मिळवणे शक्य नाही. आता संध्याकाळ झालीय. उद्या मी ती विकत आणीन व परवा तू ती घेऊन जा.’ त्यावर ती म्हणाली, ‘पण बाबा बाईंनी ती उद्याच आणायला सांगितलीय. उद्या नाही नेली तर बाई ओरडतील.’ त्यावर माझे उत्तर होते, ‘सगळ्याच पालकांना लगेच वस्तू खरेदी करणे शक्य नसते. त्यामुळे बाईंना तू वही का आणू शकली नाहीस याचे कारण सांग आणि तरीही बाई ओरडल्या तर तो ओरडा शांतपणे ऐक. ओरडा सहन करायला शिकणे हेदेखील महत्त्वाचे शिक्षण असते बाळा!’ दुसर्या दिवशी वही न घेता ती शाळेत गेली. आणि संध्याकाळी घरी परत आल्यावर मोठ्याने हसत म्हणाली, ‘बाई ओरडल्या नाहीत. त्यामुळे ओरडा सहन करायला शिकण्याचे राहून गेले ना बाबा!’
……
डाॅ. रुपेश पाटकर
भावतरंग..! – साईबाबांची शिकवण ! – मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. रुपेश पाटकर यांचा संवेदनशील लेख.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


