नवी दिल्ली : पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये हल्ला करुन २६ पर्यंटकांची हत्या केली होती. त्यानंतर भारताने पाकिस्तानची चारही बाजूने कोंडी करण्याचे काम सुरु केले आहे. तसेच भारत लष्कारी कारवाई पाकिस्तानवर करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे स्पष्ट शब्दांत संदेश दिले होते. त्यातच पाकिस्तानविरोधात भारताची संरक्षण सज्जतेसाठी देशभरात ७ मे रोजी ‘मॉक ड्रिल’ करण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले. या नंतर पाकिस्तान आणखी घाबरला आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारत कधीही एलओसीवर मिलिट्री स्त्रईक करणार असल्याचे म्हटले आहे.
इस्लामाबादमध्ये माध्यमांशी बोलताना ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, भारत एलओसीवरील कोणत्याही प्वाइंटवर कधीही हल्ला करु शकतो. परंतु पाकिस्तान भारताच्या हल्ल्यास चोख प्रत्युत्तर देणार आहे. पाकिस्तानने यापूर्वीच पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. परंतु भारत त्याला तयार नाही. कारण त्यामुळे नवी दिल्लीच्या निराधार आरोपांमागील सत्य बाहेर येईल.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्यापूर्वी पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ता तरार यांनीही, भारताकडून संभाव्य हल्ल्याच्या धोका व्यक्त केला होता. पुढील २४-३६ तास महत्त्वाचे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, भारताने ७ मे रोजी नागरी सुरक्षेसाठी हवाई हल्ला, ब्लॅकआउट, नागरिक प्रशिक्षणासह रंगीत तालीम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची भीती पाकिस्तानने घेतली आहे. देशात ५४ वर्षानंतर मॉक ड्रिल होत आहे. यापूर्वी १९७१ मध्ये मॉक ड्रिल झाले होते. १९७१ मध्ये भारत- पाकिस्तान दरम्यान दोन आघाडींवर युद्ध झाले होते. त्या युद्धाच्या ५४ वर्षानंतर आता मॉक ड्रिल होत आहे.


