Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

विद्यालय माझे देवाचे मंदिर !, तब्बल २३ वर्षांनी हरवलेली पाखरे रमली आठवणींच्या हिंदोळ्यावर.

वेंगुर्ला : श्री कुलदेव विद्यामंदिर, पेंढऱ्याची वाडी-पेंडूर या प्राथमिक प्रशालेत सन २००३ पासून विहार करून गेलेली पाखरे पुन्हा एकदा परतली. आणि माजी विद्यार्थ्यांच्या पुन्हा येण्याने अक्षरश: मोहरून गेलेली पहायला मिळाली. इयत्ता सातवीतून पुढे गेलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेसाठी काही तरी करावे, या उद्देशाने एकत्र येण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला.आणि सन २००३ पासूनच्या विद्यार्थ्यांनी शाळेतच भेटण्याचे ठरविले. त्यानुसार कार्यरत शिक्षकांशी आप्पा गावडे यांनी संवाद साधला. आणि ४ मे रोजी सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेत स्नेहसंमेलन घडून आले.यापैकी काही विद्यार्थी कोरोना काळात या शाळेत क्वारंटाईन होते.. त्यावेळी आपल्या शाळेसाठी आपण काही करावे, असे त्यांनी ठरवले. जातपात न बघता, राजकारण न करता जर शाळेत कार्यक्रम करत असाल तर आम्ही आपल्यासोबत आहोत, असे शिक्षकांनी सांगितल्यावर स्नेहमेळाव्याच्या तयारीस सुरुवात झाली.
बरेच जण पुणे, मुंबईमध्ये कामाला होते.गावी असलेल्यांनी कंबर कसून पूर्व .तयारी केली. त्यादरम्यानच्या गुरुजनांचे नंबर मिळवून त्यांना फोन केले गेले. प्राथमिक शाळेच्या मुलांचे गेट टुगेदर आजवर ऐकिवात नसल्याने वयाने पंचाहत्तरी गाठलेले, इतर ठिकाणी कार्यरत असलेले परंतु काही महिन्यांनी निवृत्त होणारे गुरुजन उपस्थित राहिले.

मुलांनी शाळा सजवली. माजी विद्यार्थ्या सोबत आजी शिक्षक आणि विद्यार्थी कामाला लागले. आणि गेट टुगेदर दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून प्रांगण गजबजू लागले.

गावचे सरपंच व शाळेचे माजी विद्यार्थी संतोष गावडे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केले…
दहा वाजता शाळेची घंटा वाजली. सर्वजण सजलेल्या
प्रार्थना हॉलमध्ये जमले. व व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू झाला.

खड्या आवाजातील ‘परेड सावधान… एक साथ राष्ट्रगीत शुरु कर…’ सूचना ऐकताच तालासुरात राष्ट्रगीत, राज्यगीत गाऊन आणि खरा तो एकची धर्म ही प्रार्थना झाली.
त्यानंतर दीप प्रज्वलन, छत्रपती शिवाजी महाराज आणि शारदा मातेचे पूजन व मान्यवरांचे स्वागत झाले..

आजी-माजी शिक्षक, इतर पाहुणे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गुरुजनही भारावून गेले.

यावेळी गुरुजनांबरोबर शिष्यांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला. साऱ्यांचे कंठ दाटून आले होते. सैन्यामध्ये कार्यरत असलेला नवनाथ राऊळ हा माजी विद्यार्थी भाऊक झाला. त्याच्या पापण्या ओलावल्या होत्या. आपण आपल्या बाईंवर काही कारणाने रागावलो होतो, याची कबुली देताना निलेश रेडकरने गुरुजनांच्या डोळ्यात पाणी तरळले. आप्पा गावडे याने दहावीत दोनदा नापास होऊनही मुंबईत गेल्यावर नोकरी करता करता शिक्षण कसे पूर्ण केले, आणि चांगली नोकरी असतानाही पखवाज वादनाचे धडे इतरांना कसे देतो, हे सांगून प्रत्येकापुढे एक आदर्श ठेवला.
एरंडाच्या बिया दहा-बारा मुलांनी खाल्यामुळे ओढवलेला कठीण प्रसंग, किंवा भर पावसात शाळा चुकवून लपून बसलेल्या बाळांना शोधून आणणे, असे अनेक प्रसंग ऐकताना सभागृह भारावून गेले होते. वीणा गावडे हिने लहान असूनही खूप छान विचार मांडले.गावचे प्रथम नागरिक संतोष गावडे यांनी शाळा बांधणी आणि विविध भौतिक सुविधा पुरवल्याबाबत सांगितले.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गौरी फटनाईक, उपाध्यक्ष नंदकिशोर चव्हाण आणि मिलिंद गावडे यांनी उत्तम सहकार्य केले.

कार्यक्रम संपूच नये असे वाटत असताना अध्यक्षीय भाषण झाले.
यावेळी बाबुराव गवंडे, सुरेश राऊळ उभयता, सिद्धे गुरूजी , मिलन सांगेलकर, काजल जोशी, सीताराम लांबर, चिले गुरूजी, बालकृष्ण गोसावी, तसेच विद्यमान शिक्षक काळोजी सर, तेंडोलकर सर, बिर्जे सर, शेळके सर, मुख्याध्यापिका देवयानी आजगावकर आणि निवृत्त मुख्याध्यापक भाऊ आजगावकर हे सारे गुरुवर्य उपस्थित होते.
या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला लेझीम, वाद्य संच, फॅन, निवेदन स्टँड अशा भेटवस्तू दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केतन गावडे याने केले. पूर्ण निवेदन ओघवत्या शैलीत स्मिता गावडे यांनी केले. ज्योती गावडे हिने स्वतः मुंबईहून आणलेल्या पुरणपोळ्यांवर सर्वांनी ताव मारला.
‘पुन्हा भेटूया’ असे सांगून जड पावलांनी सर्वांनी एकमेकांचा निरोप
घेतला.

  • शब्दांकन –
  • मुख्याध्यापिका देवयानी आजगावकर

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles