जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फुटला त्यावेळी मला अजित पवार यांनी ऑफर दिली होती, असा मोठा गौप्यस्फोट शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर केला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधला एक मोठा गट अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत. यात एकनाथ खडसे यांचं देखील नाव समोर येत आहे. त्यावर आज खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, अजित पवार यांच्या गटात आमच्या गटातून जळगाव जिल्ह्यातले काही लोक गेले आहेत. ज्यांना जायचं होतं ते गेले. ज्याना राहायचं होतं ते राहिले आहेत. त्यात अजून कोणी त्यांच्या गटात जाईल असं मला वाटत नाही. माझ्यासह जे कोणी उरलेले आहेत, ते कायम शरद पवार यांच्या सोबत असतील. आमच्यासाठी शरद पवार साहेबांचा निर्णय हा आमचा निर्णय असतो. या चर्चांना काहीही अर्थ नाही. अजित पवारांनी आपला वेगळा गट तयार केला आणि राष्ट्रवादी फुटली त्याचवेळी मला अजित पवार यांच्या गटात येण्याबद्दल निरोप देण्यात आला होता. मात्र मी तेव्हाही गेलेलो नाही. आम्ही कायम शरद पवार यांच्या सोबतच राहू, असं खडसे म्हणाले आहेत.


