सावंतवाडी : धमाल, मस्ती, खेळ, बरोबरच प्रेमळ खोडकरपणा आणि तेवढ्याच हळव्या आठवणींचा मागोवा यामुळे आंबोली येथील वैशाली नेचर रिसॉर्ट, परिसरात हास्यकल्लोळ माजला, निमित्त होते कलंबिस्त इंग्लिश स्कूल, इयत्ता दहावीच्या 1993-94 सालच्या वर्गातील सवंगड्यांचे स्नेहसंमेलन ! या संमेलनात मिनी शाळा भरली होती. या हरहुन्नरी बॅचचे हे सलग तिसरे संमेलन, दरवर्षी आपल्या व्यस्त दैनंदिनीतून मुद्दाम वेळ काढून ही सर्व मंडळी प्रेमाने एकमेकांना भेटायला आणि आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत या हृदयीचे त्या हृदयी सांगायला खूप लांबून येऊन आवर्जून भेटतात.
y
संमेलनात ही मंडळी आनंद लुटायला आले होते. यामध्ये सतीश सावंत, दिपक राऊळ, विलास राऊळ, प्रवीण कुडतरकर, राजू गोवेकर, अनिल राऊळ, सुभाष कुडतरकर, विष्णू राऊळ, संतोष सावंत, रामा राऊळ (शिरशिंगे), महेश राऊळ, महेश मडगावकर संतोष राऊळ (शिरशिंगे) गोपाळ बांदेकर, जयेंद्रत राऊळ, कल्पना सावंत, दिपा नाईक, संगीता गावडे, ज्युली अल्फान्सो, सुषमा सावंत, कलेशा म्हाडगुत, मनीषा राऊळ आदी वर्गमित्र सहभागी झाले होते. रविवार दि. 11 मे 2025 रोजी सकाळी गरमागरम आंबोळी, कांदा भजी व चहाचा आस्वाद घेऊन 10.00 वाजता सर्वजण रिसॉर्टवर हजर झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांना तसेच दिवंगताना ग्रुपच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. देवी सरस्वतीचे प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन सौ. सुषमा कविटकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.दिपक राऊळ यांनी केले. त्यानंतर गणेश वंदना करून उपस्थित सर्वांचा परिचय करण्यात आला. केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले. त्यानंतर सुरू झाला खऱ्या अर्थाने जल्लोष – शालेय आठवणी, किस्से, कराओके गाणी, डान्स, फनी गेम्स यात वेळ कसा निघून गेला कळलेच नाही. अंतरंगात दडून बसलेले विविध गुण प्रगट झाले, मनात गुणगुणत असलेली गाणी ओठांवर आली, थेट माईकवर घुमू लागले मधुर शब्द, न बाहेर पडणाऱ्या शब्दांनी जादू केली, ही जादू होती मैत्रीच्या भेटीची. प्रत्येक जण विविधतेने आपले प्रकटन साथ देत होता, मनाच्या धुंद-बेधुंद लहरी ओसंडून वाहू लागल्या होत्या, सर्वजण कधी लहान झाले त्यांनाच कळले नाही. वरील करमणुकीचा कार्यक्रम घेण्यासाठी श्री व सौ. कपिल कांबळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांचेही ग्रुपच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर श्री विष्णू राऊळ यांनी आभार मानून करमणुकीचा कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.
दुपारी वनभोजनाचे आयोजन करून भोजनाचा आस्वाद घेण्यात आला. मग जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गप्पा गोष्टींचा फंड रंगला. 93-94 च्या ग्रुपच्या वतीने समाजातील गरजू दुर्बल व अनाथ घटकांसाठी मदत करण्याच्या हेतूने सन 2023 मध्ये दिशा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील गरजू लोकांना मदत करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. या ग्रुपच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांना प्रकाश देण्याचे काम हाती घेतलेले आहे. हे काम सर्वांच्या सहकार्याने असेच चिरंतर सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. दिशा फाऊंडेशनचा मागील वर्षाचा लेखाजोखा श्री. दिपक राऊळ यांनी सर्वांसमोर सादर केला. त्यानंतर पुढील गेट-टुगेदर बाबत साधक-बाधक चर्चा करून अवघ्या एका दिवसात वर्षभरासाठी पुरेल असे स्नेहाने खाद्य गोळा करून निघून गेले आपल्या घरट्याकडे, जीवन रंगाचे स्वप्न साधण्यासाठी.
अशी पाखरे घेतली आणि स्मृती ठेवून जाती
दोन घडींचा डाव वेड्यासारखा खेळून जाती
संध्याकाळी सर्व मित्र-मैत्रिणी जड अंतकरणाने आपापल्या घराकडे मार्गस्थ झाली ती पुढील गेट-टुगेदरला यायचे हा दृढ निश्चय करूनच.