शेवटी रायगडची निवडणूक बिनविरोध. ; अनिकेत तटकरे होणार आमदार!

रायगड : राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यात विविध मतदारसंघांतील समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. 17 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत काही ठिकाणी बंडखोरीचे चित्र कायम असले तरी अनेक मतदारसंघांमध्ये पक्ष नेतृत्वाला उमेदवारांची माघार घडवून आणण्यात यश मिळाले आहे. विशेषतः नाशिक विधान परिषद निवडणूक सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असून गोकुळ गीते आणि गणेश गीते यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसमोर आव्हान निर्माण झाले आहे. या दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

कोकणातील राजकारणात पुन्हा एकदा राणे यांच्या प्रभावाची चर्चा रंगली असून विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घडामोडीमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे राजकीय वजन पुन्हा अधोरेखित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळ माने यांच्या माघारीमुळे निवडणुकीचे समीकरणच बदलले आहे. महाविकास आघाडीने या निवडणुकीत ताकद लावली होती. मात्र अर्ज माघारीच्या निर्णयामुळे विरोधकांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, ठाण्यानंतर आता कोकणातील रायगड विधान परिषद मतदारसंघात महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे. रायगडची जागा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांनी या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज मागे घेण्याची मुदत संपत असताना त्यांच्या विरोधात कोणताही उमेदवार मैदानात नसल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रायगडच्या जागेसाठी महायुतीत मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली होती. शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी प्रयत्न केले होते, तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांनी दावा कायम ठेवला होता. अखेर ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली. त्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबतही चर्चा रंगली असून भविष्यात यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, रायगडसह पुणे, यवतमाळ, ठाणे, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या जागाही बिनविरोध होण्याच्या मार्गावर असून राज्यातील निवडणूक चित्र अधिक स्पष्ट होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles