समाजाच्या उत्कर्षासाठी तरुणांनी उच्च पदांवर जावे! : विजय चव्हाण. ; सावंतवाडीत चर्मकार समाजाचा गुणवंत विद्यार्थी सत्कार व स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.

सावंतवाडी : गुणवंत विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन एमपीएससी, यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांद्वारे प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळवावा आणि समाजाच्या प्रगतीत मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजय चव्हाण यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या सावंतवाडी शाखेतर्फे श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व स्नेहमेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच समाजातील ज्येष्ठ व निवृत्त नागरिकांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा मंडळाचे माजी अध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी आवश्यक माहिती संकलनाचे काम जिल्हा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केल्याचे सांगितले. मुंबईतील आझाद मैदानावर जाऊन समाजाचे प्रभावी प्रतिनिधित्व करत त्यांनी नेतृत्वाची जाणीव करून दिल्याचे नमूद करत त्यांनी पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. समाजमंदिरात कार्यक्रमांसाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून दिल्याने आता समाजाला कार्यक्रमांसाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे उद्घाटन विजय चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम ओटवणेकर, जिल्हाध्यक्ष सुधीर जाधव, तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, नामदेव चव्हाण, नरसू रेडकर, ऋषिकेश चव्हाण, स्वप्नील चव्हाण, जिल्हा समन्वयक बाबुराव चव्हाण, लवू चव्हाण, दिलीप इन्सुलकर, माजी तालुकाध्यक्ष गणेश म्हापणकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर तळकटकर, तालुका सचिव जगदीश चव्हाण, निवृत्त उपशिक्षणाधिकारी परशुराम चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य ओमप्रकाश तिवरेकर, लक्ष्मण आरोसकर, संजना चव्हाण, सूर्यकांत चव्हाण, विजय ओटवणेकर, सुधाकर बांदेकर, शांताराम पवार, एकनाथ चव्हाण, संभाजी कांबळे, नरेश कारिवडेकर, कल्याण कदम आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक तालुका सचिव जगदीश चव्हाण यांनी केले. समाजबांधवांच्या देणगी व सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन सौ. संजना चव्हाण यांनी केले, तर उपस्थितांचे आभारही व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles