सावंतवाडी : वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी तब्बल 500 कोटी बजेटमध्ये तरतूद असूनही खर्च केले गेले नाहीत, हे आमचे दुर्दैव आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या लोकांनी जागा दिल्याने कोकण रेल्वे झाली अन्यथा ती सुद्धा झाली नसती. त्यामुळे कोकण रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे आणि यापुढेही राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्ष भेटून कोकण रेल्वेबाबत होणाऱ्या दुर्लक्षबाबत मी लक्ष वेधणार आहे, असे आश्वासन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे प्रवासी संघटनेला दिले. सावंतवाडी येथील अपुरे राहिलेल्या रेल्वे टर्मिनसबाबत विचारलं असता ते बोलत होते. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव व यशस्वी युवा उद्योजक मिहीर मठकर, सीमा मठकर यांनी माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. यावेळी माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, सौ. उमा प्रभू, ज्येष्ठ पत्रकार रमेश बोंद्रे आदी उपस्थित होते.

यावेळी पूर्णत्वास न आलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसबाबत त्यांनी श्री. प्रभू यांचे लक्ष वेधले. यावेळी माजी केंद्रीय मंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, मी मंत्री झालो तेव्हा कोकण रेल्वेला 25 वर्षे झाली होती. एवढ्या वर्षात ही रेल्वे शेडमध्ये लागून ठेवली होती. कोकण रेल्वेला मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठी माझे प्रयत्न राहिले आहेत. तब्बल 13 स्टेशन्स मी नवीन पद्धतीने सुरू केले. दुपदरीकरणाचे काम असेल किंवा विद्युतीकरणाचे काम असेल तेही बऱ्यापैकी पूर्ण केले. मात्र आपलं दुर्दैव की वैभववाडी ते कोल्हापूरसाठी 500 कोटी बजेटमध्ये तरतूद असूनही खर्च केले गेले नाहीत. कोकण रेल्वे ही अत्यंत सर्वसामान्य माणसांची हक्काची रेल्वे आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या लोकांनी जागा दिल्याने ही रेल्वे झाली अन्यथा ती सुद्धा झाली नसती. मात्र यापुढे सावंतवाडी रेल्वे टर्मिनसबाबत व कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून आपण त्यांना कोकण रेल्वेच्या सुविधांबाबत नक्कीच विचारणार आहोत, असेही सुरेश प्रभू यांनी सांगितले. यावेळी मिहिर मठकर यांनी त्यांचे आभार मानले.



