संजय पिळणकर
मळेवाड : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.या पावसामुळे काही भागात बरेच नुकसान झाले आहे.गेले दोन दिवस तर या पावसाच्या तडाख्यात झाडे उन्मळून मोठे नुकसान होताना दिसत आहे.

दरम्यान आज गुरुवारी पहाटे मळेवाड शाळा नं.१ च्या जवळच वळणार असलेले भले मोठे झाड रस्त्यावर आडवे झाले.त्यामुळे वीज वितरणचे पोल जमीनदोस्त होऊन विद्युत वाहिन्या तुटल्या.अशातच हे झाड रस्त्यावर पडल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. कामानिमित्त गोव्याला जाणाऱ्या बऱ्याच जणांना याचा फटका बसला.मात्र मळेवाड येथील युवक वैभव नाईक यांनी याबाबतची माहिती ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक यांना देताच त्यांनी लागलीच आपल्या सहकारी बापू मुळीक, गजानन परब,रवींद्र तळववणेकर, संतोष गावडे व ग्रामस्थांच्या सहकार्याने हे झाड तोडून बाजूला केले व दोन्ही बाजूने बंद असलेली वाहतूक सुरळीत केली.यावेळी येथील वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले व त्यांचे आभार मानले.
मात्र वीज वितरणचे पोल जमीनदोस्त झाल्याने व वीज वाहिन्या तुटल्यामूळे वीज वितरणचे मोठे नुकसान झाले आहे.


