सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची नुकतीच पुणे येथे बदली झाली आहे. शुक्रवारी कुडाळ एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, सचिव ॲड. नकुल पार्सेकर, सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील तसेच प्रतिष्ठित वकील ॲड. विक्रम भांगले यांनी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची सदिच्छा भेट घेत त्यांना जिल्हावासियांतर्फे तसेच कुडाळ एमआयडीसी असोसिएशनतर्फे सस्नेह निरोप देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा प्रदान केल्या.

यावेळी आपण सिंधुवासियांचे प्रेम कधीच विसरणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने आपल्याला खूप प्रेम दिले. येथील वातावरणही मला खूप भावले, असे मनोगत मावळते अधीक्षक श्री. अग्रवाल यांनी व्यक्त केले.

दरम्यान ॲड. नकुल पार्सेकर यांनी अधीक्षक अग्रवाल यांनी केलेले काम अत्यंत कर्तव्यदक्ष असून जनतेच्या मनात त्यांनी आपल्या कामाने व वागणुकीने आदर्शवत ठसा उमटवला आहे. ज्यामुळे पोलीस प्रशासनाचा आदर जनतेच्या मनात चांगलाच वाढला असल्याचे नमूद केले.


