सावंतवाडी : अवकाळी झालेल्या पहिल्याच पावसात मळगाव घाटात गॅस पाईप लाईनच्या निष्काळजी कामामुळे रस्त्यावर माती साचली. त्यामुळे आरोग्य विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी रेमो मॅथ्यू यांचा अपघात होऊन बळी गेला आहे. याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार आहे असा आरोप करीत त्यामुळे ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा व वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाची सखोल चौकशी करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची भेट घेऊन केली आहे. श्री. चव्हाण यांनी निश्चितपणे आपण या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल व दोषी असतील त्यांचा अहवाल तयार केला जाईल.
संबंधित ठेकेदाराला सूचनाही करण्यात येईल. शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी अवकाळी पाऊस पडला पण आता पुन्हा पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पुढे पाऊस अजून पडायचा आहे. त्यामुळे रस्त्यांवर तसेच अन्य भागात कोठे झाडे अथवा दरडीचा भाग कोसळण्याची भीती आहे.

यासंदर्भात संबंधित विभागाला दक्षता घेण्यास सूचना कराव्यात. जेणेकरून अपघात घडणार नाहीत याची उपायोजना आतापासूनच करावी असे सुचित केले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस अधिकारी श्री चव्हाण व वनविभागाचे अधिकारी यांची भेट घेतली व श्री मेथी यांच्या अपघाताबाबतची सर्व हकीकत स्पष्ट केली.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार , उपतालुका संघटक रमेश सावंत, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष बाळू परब, अनुप नाईक, संदीप गवस, प्रशांत बुगडे, उमेश नाईक, अशोक धुरी, शिवदत्त घोगळे आदी उपस्थित होते.
योग्य तपास करून कारवाई करू ! : पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाला आपण सदर घटनेची वस्तुनिष्ठ माहिती घेत असून योग्य तपास करून जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल लवकरात लवकर करू असे आश्वासन पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिले.


