कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह वीज ग्राहकांनी सोमवारी दुपारी ३.३० वाजता महावितरण सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांची भेट घेण्याचे जाहीर केले होते व त्याप्रमाणे त्यांना सूचित केले होते. परंतु जिल्ह्यात गेले आठ दहा दिवस अवकाळी पावसाने विजेचा खेळखंडोबा झालेला असताना देखील अधीक्षक अभियंता सिंधुदुर्ग यांनी वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सामोरे न जाता नांदेड येथून आपले सामान आणण्यासाठी जाणे महत्त्वाचे ठरवून अनुपस्थित राहिले. त्यांच्या गैरहजेरीत कुडाळ विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.वनमोरे आणि कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.माळी व उपकार्यकारी अभियंता श्री.राऊत यांनी वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. परंतु तोंडी आश्वासने नको लेखी उत्तर द्या अशी मागणी केल्यावर लेखी उत्तरे देण्याचे मान्य केले त्याचबरोबर वीज पुरवठा अखंडित न राहण्यासाठी जुने इन्फ्रास्ट्रक्टर कारणीभूत असल्याची खंत व्यक्त केली. यावेळी वीज ग्राहक संघटना प्र.अध्यक्ष संजय लाड, जिल्हा सचिव दीपक पटेकर, जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संजय गावडे, कणकवली तालुकाध्यक्ष दादा कुलकर्णी, वेंगुर्ला तालुका सचिन जयराम वायंगणकर, माजी पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस, मानवाधिकार आयोग कोकण विभाग अध्यक्ष संतोष नाईक, नारायण जाधव आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या जुलै महिन्यात अधीक्षक अभियंता पदी अशोक साळुंखे यांची नियुक्ती झाली होती. परंतु अल्पावधीतच त्यांची बदली झाल्याने नूतन अधीक्षक अभियंता म्हणून नांदेड येथून बदली झालेले अभिमन्यू राख यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कारभार स्वीकारला. त्यामुळे नूतन अधीक्षक अभियंता यांना जिल्ह्यातील महावितरणच्या परिस्थिती माहिती देऊन जिल्ह्यात विजेच्या असलेल्या समस्या सोडविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यासाठी वीज ग्राहक संघटनेच्या वतीने सोमवारी त्यांची भेट घेण्याचे नियोजन केले होते. परंतु वीज ग्राहक संघटनेच्या रोषाला सामोरे जाण्यापेक्षा श्री.राख यांनी नांदेड येथे सामान शिफ्टिंग करण्यासाठी जायचे कारण देत भेट टाळली. त्यामुळे कुडाळ आणि कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता अनुक्रमे श्री.माळी व श्री. वनमोरे आणि उपकार्यकारी अभियंता श्री राऊत सामोरे गेले.
कुडाळ येथील भेटी दरम्यान वैभववाडी, देवगड ते दोडामार्ग असा संपूर्ण जिल्ह्यातील वीज समस्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सातोसे उपसरपंच वसंत धुरी, प्रसाद मांजरेकर यांनी गावातील जीर्ण झालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या पोल मुळे शाळेच्या मुलांना धोका असल्याने ट्रान्सफॉर्मरची जागा बदलणे, नवीन एल टी लाइनचे बंद असलेले काम कधी सुरू करणार हे लेखी लिहून देण्यास भाग पाडले. वैभववाडी येथील तरुण उद्योजक बांदिवडेकर यांनी ३.५ कोटींचे कर्ज घेऊन उभारलेल्या उद्योगासाठीच्या रखडलेल्या विद्युत जोडणीबाबत ह्युमन राईट असो. कोकण विभाग प्रमुख संतोष नाईक यांनी कणकवलीचे कार्य.अभियंता माळी यांना जाब विचारला, त्यावर एक आठवड्यात जोडणी पूर्ण करण्याचे लेखी देण्याचे त्यांनी मान्य केले. मळेवाड येथून तळवडे येथे येणारी लिंक लाइन का रखडली या बाळा जाधव यांच्या प्रश्नावर लोकांचे सहकार्य मिळत नसल्याची खंत कार्य.अभियंता यांनी बोलून दाखवली. त्यावर तत्काळ दुसऱ्या दिवशी मळेवाड येते भेट देऊन प्रश्न सोडविण्यास कार्य.अभियंता राजी झाले. तळवडे येथील सब स्टेशन साठी देखील पाहणी करण्याची त्यांनी तयारी दर्शवली व तसा पाहणी अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवून तळवडे सब स्टेशन साठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. गेली दोन वर्षे कंत्राटी वायरमन यांच्या पगारवाढ आणि त्यांना ३ वर्षानंतर सेवेत कायम करण्यासंदर्भात संजय गावडे व संजय लाड यांनी प्रश्न उपस्थित करून तशी वीज ग्राहक संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली. बांदा, खारेपाटण हे भाग पावसाळ्यात पुराच्या पाण्यात बुडले जातात. त्याकरिता बांदा कट्टा कॉर्नर, मच्छी मार्केट, वाफोली रोड येथील ट्रान्सफॉर्मर उंची वाढविणे, गरज पडल्यास जागा बदलणे अशा मागण्या संजय लाड यांनी केल्या. त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. माडखोल, ओटवणे, सातोसे येथील अपूर्ण असलेल्या ११केव्ही ट्रान्सफॉर्मर रखडलेल्या कामांच्या बाबतीत सदर कंत्राटदारांना तात्काळ काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात याव्या. माडखोल वेंगुर्ला सह जिल्ह्यातील काही ठिकाणी सहाय्यक अभियंता इत्यादी पदे रिक्त असल्याने तिथे नव्याने नेमणुका करण्यात याव्या. अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल अशी भूमिका संजय लाड यांनी घेतली. वेंगुर्ला येथील कार्यालयाचे विभाजन करून दोन स्वतंत्र विभाग कार्यान्वित करावेत अशी सूचना संजय गावडे यांनी मांडली. त्याचप्रमाणे रेडी, भेडशी , कणकवली येथील सहाय्यक अभियंता कामात दिरंगाई करतात त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी ॲड नंदन वेंगुर्लेकर यांनी मागणी केली. महावितरणच्या कारभारावर माजी पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी खडे बोल सुनावले. सावंतवाडी शहरात सातत्याने होणारा खंडित वीज पुरवठा यावर बोलताना सचिव दीपक पटेकर यांनी “तुमच्या ऑफिसमध्ये जनरेटर आहे का..? एवढ्या वेळात आमच्या सावंतवाडीत दोन चार वेळा वीज खंडित झाली असती” मिश्किल टिपण्णी करून सावंतवाडी शहरात खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबद्दल नाराजी व्यक्त केली. महेश खानोलकर यांनी लिंक लाइन साठी उभे केलेले खांब वाकलेल्या स्थितीत असल्याचे सांगून सुरू असलेल्या चुकीच्या पद्धतीच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. वीजनिक आनंद नाईक, तुकाराम म्हापसेकर यांनी देखील तांत्रिक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले. जिल्हा समन्वयक ॲड नंदन वेंगुर्लेकर यांनी जिल्ह्यातील सर्व मुद्द्यांवर मुद्देसूद प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांना जोपर्यंत समाधानकारक उत्तरे लेखी स्वरूपात मिळत नाहीत तोपर्यंत कार्यालयातून बाहेर पडणार नाहीत अशी धमकी वजा सूचना केली. त्यामुळे निरुत्तर झालेल्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेली सर्व कामे करून देण्याबाबत लेखी लिहून देण्याचे मान्य केले आणि वीज ग्राहक संघटनेच्या मागण्या वरिष्ठ पातळीवर पाठविण्याचे देखील मान्य केले.
यावेळी वाल्मिकी कुबल, ज्ञानेश्वर जाधव, अनुज पडवळ, सावंतवाडी तालुका सचिव समीर शिंदे, कणकवली तालुकाध्यक्ष गुरुनाथ कुलकर्णी, आनंद देवळी, कणकवली उपकार्यकारी अभियंता राऊत आदी उपस्थित होते.
इन्फ्रास्ट्रक्टर जुने असल्याने वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढते ! : कार्यकारी अभियंत्यांची खंत. ; नूतन अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख वीज ग्राहक संघटनेला सामोरे न जाता नांदेडला रवाना.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


