कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिकांचा मेळावा लवकरच घेण्यात येणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्ग शाखेतर्फे हा साहित्यिकांचा मेळावा घेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील साहित्यिकांनी आपली पुस्तके अथवा लेखन साहित्य येत्या 20 जूनपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषद, कुडाळ येथील जिल्हा शाखेकडे जमा करावे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी दिली.
कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा शाखेची कार्यकारिणीची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सचिव विठ्ठल कदम, खजिनदार भरत गावडे, डॉ. दिपाली काजरेकर, प्रा. सुभाष गोवेकर, तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, वृंदा कांबळी, सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जुलै महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिकांचा मेळावा घेण्याबाबतचे नियोजन करण्यात आले. हा मेळावा कुडाळ येथे घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व साहित्यिकांना एकत्र करून साहित्यिकांची देवाण-घेवाण आणि त्यांच्या साहित्य निर्मितीला एक दर्जा देण्याच्या दृष्टीने हा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील ज्या साहित्यिकांकडे त्यांनी लिखाण केलेले पुस्तके अथवा काही साहित्य कृती असेल अशांनी आपली पुस्तके येत्या 20 जूनपर्यंत जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्याकडे सादर करावे. अथवा प्रत्येक तालुक्यातील तालुकाध्यक्ष यांच्याकडे 15 जूनपर्यंत द्यावीत असे, आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा शाखेतर्फे साहित्य लेखन कार्यशाळाही घेण्यात येणार आहे. वर्षभरात विविध उपक्रम घेण्याचेही नियोजन करण्यात आले. कित्येक वर्षानंतर सावंतवाडी येथे जिल्हा साहित्य संमेलन सावंतवाडी शाखेने उत्तम नियोजन करून यशस्वी केले. त्याबद्दल सावंतवाडी शाखेचा सर्व कार्यकारिणी, पदाधिकारी व सदस्य यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी घेण्यात आला.
दरम्यान या बैठकीत कुडाळ तालुकाध्यक्ष वृंदा कांबळी यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार ग्रामपंचायतमार्फत प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भरत गावडे, विठ्ठल कदम, डॉ. दिपाली काजरेकर
ॲड. संतोष सावंत, प्रा. सुभाष गोवेकर उपस्थित होते.


