सावंतवाडी : शिक्षकी पेशा हा समाज घडविणारा व्रतस्थ पेशा आहे. या पेशात आलेला माणूस कधीच थकत नाही, दमत नाही, भागत नाही. तो सातत्याने अद्यावत ज्ञानाने परिपूर्ण बनत जातो. म्हणूनच शिक्षक हा समाजात लोकप्रिय ठरतो. ममता जाधव ‘ताई’ ह्या अशाच पठडीतील हाडाच्या शिक्षिका असून गायन, वादन, ज्ञान याबरोबरच समाजकार्यात आघाडीवर असणाऱ्या शिक्षिका आहेत. त्यांचे शिक्षकी काम हे अत्यंत आदर्श स्वरूपाचे असल्याने नव्या पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त सरव्यवस्थापक तथा समता प्रेरणाभूमीचे अध्यक्ष दीपक पडेलकर यांनी केले. आजगाव केंद्र शाळेच्या उच्चश्रेणी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका तथा शिव-फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील आघाडीच्या महिला कार्यकर्त्या ममता मोहन जाधव यांच्या सेवानिवृत्तप्रीत्यर्थ सिद्धार्थ नगर, शेर्ले येथे आयोजित केलेल्या सत्कार तथा निरोप समारंभात श्री. पडेलकर प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष विजय नेमळेकर होते. यावेळी विचारपीठावर तथागत नागरिक पतसंस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजू, सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत कदम, ‘जनवादी’चे अंकुश कदम, अशोक कदम, मीनाक्षी तेंडुलकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.


प्रारंभी भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत मोहन जाधव यांनी केले.
त्यानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्री. पडेलकर हे बोलत होते. श्री पडेलकर यांनी सुरुवातीलाच माणसाची निवृत्ती ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे सांगून सृष्टीचा तो एक अविभागज्य भाग असल्याचे स्पष्ट केले. एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे आपली सूत्रे सोपवायची असतात. हे चक्र सांगून ममता जाधव यांनी आपलं कर्तव्य पार पाडून आपल्या व्यवसायाचा आनंद घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वादापेक्षा संवादावर भर देणे, अपार कष्ट करणे, समोरच्या माणसाशी मैत्रीने वागणे व आदर करणे, आणि सर्वांना आपल्या सोबत घेऊन चालने, हे ममताताईंचे विशेष गुण असल्याचे सांगून विद्यार्थ्यांचे हित आणि सामाजिक बांधिलकी हा त्यांचा स्थायीभाव असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या विविध पैलूंचे देखील त्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी सूर्यकांत कदम यांनी ममता ताईंनी आपल्या सेवानिवृत्तीचा काळ आमच्या सेवानिवृत्त संघटनेत सक्रिय होऊन समाजाची सेवा करावी, असे आवाहन केले.
अरविंद वळंजू यांनी तथागत पतसंस्थेच्या माध्यमातून समाजात विविध उपक्रम राबवून समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्याचा आपण प्रयत्न करत असल्याने आणि त्या प्रयत्नाचा एक भाग ममताताईने सहभागी होऊन पूर्ण करावा, असे आवाहन केले.
यावेळी अंकुश कदम, मीनाक्षी तेंडुलकर ,संतोष कदम, प्रा. रुपेश पाटील, साक्षी खानोलकर, श्रद्धा कदम, संतोष कदम यांनी देखील ममता जाधव यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान सत्काराला उत्तर देताना ममता जाधव यांनी आपला संघर्षाचा काळ स्पष्ट करून सत्काराबाबत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय कदम, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा चिटणीस संजय पेंडुरकर, बामसेफ जिल्हाध्यक्ष भालचंद्र जाधव, वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, कवी विठ्ठल कदम यांच्यासह सेवानिवृत्त नगररचनाकार पी. एल. कदम, बँक अधिकारी आर. डी. कदम, निलेश जाधव , क्रांतीराज सम्राट (पत्रकार), कासवण सरपंच मिलिंद सर्पे, यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमात तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, पत्रकार मयूर चराठकर, राजू तावडे, साबाजी परब यांनी भेट देऊन पत्रकार बांधवांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.सू
सूत्रसंचालन धम्मचारी लोकदर्शी तथा परेश जाधव यांनी केले. आभार मोहन जाधव यांनी मानले.


