सावंतवाडी : आज सकाळी ५ वाजेच्या सुमारास झाराप- पत्रादेवी हायवेवर मळगाव जोशी मांजरेकरवाडी येथे मळगाव ब्रिजवर टेम्पो ट्रॅव्हलर व डंपर यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या ड्रायव्हरला झोप आल्याने त्याने मागून डंपरला जोरदार टक्कर दिली. ती टक्कर एवढी मोठी होती की डंपरची मागील दोन्हीही चाक तुटून रस्त्याच्या बाजूला पडली व टेम्पो ट्रॅव्हलर झाडावर जोरदार धडकला. या अपघातात गोवा दर्शनासाठी जाणार्या गुजरात सुरत येथील मालविया कुटुंबातील सदस्य जखमी झाले आहेत. त्यामध्ये मयूर मालविया (35), समीक्षा मालविया (32), चंद्रिका मालविया (37), बन्सी मालविया (21), हीत मालविया (10), किरीट मालविया (42) हे किरकोळ जखमी झाले तर ड्रायव्हर विजयकुमार झापडी (35) याचे हात पाय फ्रॅक्चर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोवा बांबुळी येथे पाठवण्यात आले. याप्रसंगी संजय जोशी, सचिन मांजरेकर यांनी जखमींना मदत करून 108 ला कॉल केला व त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली तर सुहास पेडणेकर यांनी अपघातग्रस्तांचे सामान आपल्या रिक्षेमध्ये घालून त्यांना हॉस्पिटलमध्ये सुपूर्द केले.

सदर घटनेच्या वेळी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले तेथील ग्रामस्थ संजय जोशी, बाळा आरोंदेकर, सुनील नेमळेकर, दीपक जोशी, सचिन मांजरेकर, प्रणव मांजरेकर, गणेश जोशी, रिक्षा चालक सुहास पेडणेकर तसेच हॉस्पिटलमध्ये तत्काळ रुग्णांना सेवा देणारे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी अपघातग्रस्तांना मदत कार्य केले असता गुजरात मालविया परिवाराकडून त्यांचे आभार मानण्यात आले.
दरम्यान, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी अघातग्रस्तांची विचारपूस करून त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था केली.


