सावंतवाडी : इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करून आपल्या शाळेचे व कुटुंबाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गौरवासाठी परफेक्ट अकॅडमी, सावंतवाडी यांच्या वतीने “परफेक्ट गौरव पुरस्कार २०२५” या भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम उद्या मंगळवार, दिनांक १० जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता श्रीराम वाचन मंदिर सभागृह, सावंतवाडी येथे संपन्न होणार आहे. या वेळी तालुक्यातील प्रत्येक शाळेतील इयत्ता १० वी मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, माजी नगराध्यक्ष संजू परब, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै, अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, माजी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनेलचे संपादक सागर चव्हाण आणि परफेक्ट अकॅडेमीचे चेअरमन डॉ. एम. आर. परब यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची उपस्थिती या सोहळ्याला विशेष महत्त्वाची ठरणार आहे.
या गौरव सोहळ्याच्या आयोजनामागे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे आणि भावी वाटचालीसाठी प्रेरणा देणे हा मुख्य उद्देश आहे.
अधिक माहितीसाठी 9325017458 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


