पंढरपूर : आषाढी एकदशी निमित्ताने राज्यभरातून विविध देवस्थानांच्या पालख्या पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाल्या आहेत. आषाढी पूर्वीच पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. त्याचवेळी पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात दर्शनाचा काळाबाजारचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सरसावले आहे. त्यावेळी माजी व्यवस्थापकासोबत पोलिसांची बाचाबाची झाली. व्हीआयपी गेटवर माजी व्यवस्थापक काही भाविकांना घेऊन जात असताना पोलिसांनी अडवले. नागरिकांनी त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. तसेच व्हिआयपी दर्शन रोखणाऱ्या पोलिसांचा सत्कार केला. दरम्यान, आता मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी परिपत्रक काढून दर्शनाचा काळाबाजार रोखण्याचा प्रयत्न केला.
पंढरपुरात रंगली चर्चा –
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे माजी व्यवस्थाक बालाजी पुदलवाड श्री विठ्ठल दर्शनासाठी काही भाविकांना व्हीआयपी गेट येथून घेऊन जात होते. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले. व्हीआयपी गेटवरील संबंधित पोलीस कर्मचारी आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील पूर्व व्यवस्थापक यांच्यात बाचाबाची झाली. विठ्ठलाच्या दरबारात बालाजी पुदलवाड यांना पोलिसांनी अडवल्याने शहरात चर्चा रंगली आहे.


