सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन्य प्राण्यांची दहशत आणि उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान महाराष्ट्र सरकारने थांबवावा. जिल्ह्यात गवारेडे, हत्ती, माकड या वन्य या प्राण्यांमुळे शेती बागायती पूर्णपणे नष्ट होत चालली आहे. या वन्य प्राण्यांना पकडायचेही नाही आणि मारायचेही नाही मग आता शेतकऱ्यांनी करायचे तरी काय ? या वन्य प्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करणे ही सरकारची जबाबदारी आहे. वन्य प्राण्यांपासून शेती बागायतीचे संरक्षण करायचे असेल तर राज्याचे ग्रामविकास आणि वनखात्याने संयुक्तरित्या उपाययोजना कराव्यात. गावागावात ग्रामपंचायतच्यावतीने सौर कुंपण बसवावे. या वन्य प्राण्यांच्या उपद्रवापासून मुक्ती मिळण्यासाठी राज्य सरकारने कोकणासाठी वेगळा निकष आणि नियमावली ठरवावी अशी कळकळीची विनंती वनमंत्री गणेश नाईक व ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांची मुंबई भेट घेऊन आपण करणार आहोत, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस, कृषी विज्ञान केंद्रचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार बिग्रेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. सावंत यांनी आज सावंतवाडीत उपवनसंरक्षक श्री. नवकिशोर रेड्डी यांची भेट घेतली व त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांना मुक्ती द्या, अशी विनंती केली. त्यानंतर ते पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले किर्लोस येथील सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत 29 मे ते 12 जून या 15 दिवसीय कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्याच नैसर्गिक शेती सुधारणा उपक्रम जवळपास जिल्ह्यातील 90 गावांमध्ये राबविण्यात आला. राज्य, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत व पंजाबराव नैसर्गिक शेती अभियान या अनुषंगाने दापोली येथील बाळासाहेब कृषी विद्यापीठ व जिल्हा कृषी विभागाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. पहिल्यांदाच हा उपक्रम राबवताना शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती बरोबर नवीन तंत्रज्ञान व कृषी संशोधन या संदर्भात अभियान राबवण्यात आले. यामध्ये शास्त्रज्ञ व शेतकरी, कृषी अधिकारी अशा एकत्रित तीन जणांच्या टीमने गावागावात अभियान राबवले. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या, असे सावंत यांनी सांगितले.


