सावंतवाडी : तालुक्यातील मळेवाड – कोंडुरे ग्रामपंचायत हद्दीतील कोंडुरा – देऊळवाडा रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून सदर रस्ता मंजूर होऊन १ वर्ष होऊन गेलं असून तस वर्षभरापूर्वी उदघाटनही करण्यात आले.
या वाडीतल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर रस्त्याचे उदघाटन केल्यानंतर प्रशासनाने याच गावात बरेच रस्ते बनवले, पण आमच्याच वाडीच्या रस्त्याला डांबरीकरण का केले गेले नाही?, रस्त्याची एवढी दुर्दशा झाली आहे की, वाहन चालकांना गाडी चालवताना बरीच कसरत करावी लागते.

रस्त्यावरून चालताना वयोवृद्ध, वडिलधाऱ्या नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावरील खडी पूर्ण उखडल्यामुळे दगडावरून वाहन गेल्यामुळे गाडी स्लीप होते. प्रशासनाकडे निधी नाही तर मग उदघाटन का केलं? येथील नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक का केली?, की फक्त निवडणुकीत मत मिळविण्यासाठीचं?, असा संतप्त सवाल येथील जागरूक नागरिकांनी केला आहे. तरी या गंभीर बाबीकडे मळेवाड – कोंडुरे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी तात्काळ लक्ष घालावे, असे आवाहन येथील नागरिकांनी केले आहे.


