पुणे : सुसंस्कृत शहर अशी ओळख असणार्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील खराडी भागात एका अज्ञात तरूणीचा खून करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून नदीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खराडी येथील नदीपात्रात या तरुणीचे धड पोलिसांना आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. खून झालेल्या या तरुणीचे वय अंदाजे 18 ते 30 वर्षे इतके आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. या परिसराच्या जवळच असलेल्या नदीपात्रामध्ये एका तरूणीचे हात, पाय आणि डोके नसलेल्या अवस्थेत धड असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर आता हा सर्व प्रकार उघडकीस आला. मृत तरुणीची ओळख अद्याप पटली नाही. या तरुणीचे वय अंदाजे 18 ते 30 इतके आहे.
पोलिसांनी या घटनेबाबत वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, अज्ञात इसमाने तरूणीला ठार मारून याबाबत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे धडापासूनचे शीर, दोन्ही हात खांद्यापासून, दोन्ही पाय खुब्यापासून धारदार शस्त्राच्या साह्याने कापून टाकले. त्यानंतर हे धड मुळा-मुठा नदीपात्रात फेकून दिले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.


