सावंतवाडी : येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय येथे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक नंबरकर यांनी ‘Say No To Drug’s Yes To life’ या अनुषंगाने विद्यार्थ्यांशी पोस्टरच्या माध्यमातून संवाद साधला. त्या म्हणाल्या, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ, दारू, अमली पदार्थ या सर्व व्यसनांचा समाजावर विशेषतः युवकांच्या जीवनावर फार मोठा घातक परिणाम होत आहे. आज गाव किंवा राज्य नव्हे तर देश पातळीवर व्यसनांना मिळणारी प्रतिष्ठा, व्यसनांना जोडून घेऊन आनंद साजरा करण्याची पद्धत रूढ होताना दिसत आहे. ही प्रथा आपल्या सर्वांसाठी धोक्याची ठरत आहे. यासाठी वेळीच सावध होऊन गाव, शहर, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणी व्यसनांच्या विरोधात जनजागृती करायला हवी, असे विचार अर्पिता मुंबरकर यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. ललितकुमार विठलानी, डॉ. शितल पाटील, डॉ. रवी गोलघाटे आदि उपस्थित होते. तर संस्था सचिव बाळासाहेब बोर्डेकर व संचालक उमाकांत वारंग यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एन. एस. एस कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना अमली पदार्थ मुक्तीची शपथ देण्यात आली.


