Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

लेखकचं करतील देशाचे कल्याण ! : शिक्षण तज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांचा विश्वास. ; महाकवी कालिदास जयंती एक प्रसन्न सोहळा, सिंधुदुर्गातील कवी दीपक पटेकर यांचा सहभाग.

पुणे : महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे (महाराष्ट्र) या संस्थेतर्फे निर्मित विविध प्रांतातील १०१ कविवर्यांच्या कवितांच्या राष्ट्रीय प्रतिधिनिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते गुरुवार दिनांक २६ जून रोजी धारेश्वर कला व क्रीडा संकुलातील सभागृहात झाले. या निमित्त अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. न. म. जोशी यांनी संस्थेबद्दल बोलताना प्रशंसनीय उद्गार काढून संस्थेच्या आजपर्यंतच्या कार्याचे कौतुक केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी घोषणा केली कि देश विश्वगुरू होणार आहे. त्यातील एक छोटेसे पाऊल महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे ( महाराष्ट्र ) टाकत आहे. माझा संस्थेच्या गर्भावस्थेपासून संस्थेशी संबंध आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी चळवळीतील कार्यकर्ता हवा. आज महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रेमापोटी जमलेले आहेत, असेच संस्थेवर प्रेम असणारे कार्यकर्ते असले पाहिजेत. कुसुमाग्रजांच्या कवितेने त्यांनी आपल्या मधुरवाणीचा समारोप केला..
महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने धायरी येथील धारेश्वर कला व क्रिडा संकुलाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य सू. द. वैद्य, उद्घाटक मा.राजेशजी पांडे (विश्वस्त सदस्य, नॅशनल बुक ट्रस्ट दिल्ली), महाकवी कालिदास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. सातपुते, उपाध्यक्ष डॉ. महेंद्र ठाकूरदास, कार्याध्यक्ष काकासाहेब चव्हाण, प्रा.अनिकेत चव्हाण तसेच महाकवि कालिदास प्रतिष्ठानचे कार्यकारी मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक कार्यातील अमूल्य योगदानासाठी पुरस्कार प्रदान –
या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने प्रा.डॉ.शुभांगी भडभडे, नागपूर यांचा महाकवी कालिदास जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तर डॉ. व्यंकटसाई चलसानी, प्राचार्य डॉ. आर. एस. झुंजारराव, कविवर्य जयंत भिडे, चंद्रकांत शहासने, रविंद्र शिवदे, पंडित संजय गरूड आदींना मान्यवरांच्या हस्ते पुणेरी पगडी , मानपत्र ,स्मृतिचिन्ह, व महाकवी कालिदास प्रतिष्ठानचा ४२५ पेजेसचा प्रातिधिनिक काव्यसंग्रह भेट देत महाकवी कालिदास लक्षवेधी पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या सन्मापत्रांचे वाचन ॲड.प्रार्थना सदावर्ते, राधिका दाते , वंदना घाणेकर , उपाध्यक्ष ॲड.संध्या गोळे यांनी केले. तर आभार समन्वयक यशवंत देव यांनी व्यक्त केले.

महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणेच्या १०१ कवींच्या कवितांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन –
महाकवी कालिदास प्रतिष्ठान संस्थेच्या १०१ कवींच्या कवितांचा समावेश असलेल्या ४२५ पानी राष्ट्रीय प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन पार पडले. याच प्रकाशन सोहळ्यात डॉ. राजेंद्र पडतुरे यांच्या “सुख हे फुलपाखरा परी” व कवी चंद्रकांत भालेराव यांचे एक अशा दोन पुस्तकांचे संस्थेच्या प्रथेप्रमाणे प्रकाशन करण्यात आले.

महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे प्रमुख मान्यवरांनी केले आपल्या मनोगतातून कौतुक –
या प्रकाशन सोहळ्यानंतर मनोगत व्यक्त करताना मा. राजेश पांडे म्हणाले, विद्यार्थी दशेपासून सामाजिक कार्यकर्ता आहे. महाकवी कालिदास प्रतिष्ठान लेखकांच्या माध्यमातून समाजात चांगले विचार पोहचविण्याचे कार्य करत आहे. त्यामुळे येणारी पिढी सक्षम होण्यास मदत होत आहे. पुणे शहराला जगाची पुस्तकांची राजधानी करण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो आम्ही लवकरच पूर्ण करू असे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले.
संस्थेचे कार्याध्यक्ष सोपान तथा काका चव्हाण यांनी सर्व पुरस्कारार्थींचे कौतुक करून भविष्यात संस्थेच्या वतीने नवं कवींना साहित्य निर्मितीसाठी संधी देण्याची घोषणा..
संस्थेचे उपाध्यक्ष डॉ महेंद्र ठाकूरदास यांनी मनोगत व्यक्त करताना विविध उदाहरणे देऊन बौध्दिक क्षमतेची चुणूक दाखवली. ते म्हणाले, मलयगिरी मध्ये राहणारी सुंदरी चंदनाला चुलीत जाळते, तिला त्याची किंमत नसते, तशी आज भारतीयांची अवस्था आहे. पश्चिमात्य संस्कृतीत सारे वाहत चालले आहेत. कालिदासांची प्रत्येक रचना, कृती आशावादी आहे. कालिदासाने जसे मातृभाषेला महत्त्व दिले तसेच या काव्यसंग्रहात कविता असलेल्या कवींनी पश्चिमात्य संस्कृती हद्दपार केलेली आहे असे सांगत १०१ कवींच्या काव्यसंग्रहाचा गौरव केला. सर्वांच्या सोबत रहा पण आपल्या मूल्यावर ठाम रहा हा रवींद्र टागोर यांनी दिलेला संदेश सर्वांच्या मनावर बिंबवून तसे वागण्याचा त्यांनी सल्ला दिला.
प्राचार्य सु. द. वैद्य यांनी काव्यसंग्रहाचे कौतुक करताना १०१ कवींच्या कवितांचा काव्यसंग्रह नव्हे हा “ग्रंथराज” आहे. कविता संग्रहातील कवितांचे संग्रहात समाविष्ट कवींनी वाचन करून इतरांना प्रोत्साहित करावे असे सांगितले.

कविसंमेलनात कवींनी जिंकली उपस्थितांची मने –
दुपारच्या दुसऱ्या सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काव्यसंग्रहात कविता समाविष्ट असलेल्या अनेक कवींनी विविध रचना सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली आणि अनेकांनी आपल्या बहारदार रचनांनी श्रोत्यांची मने जिंकली. या कविसंमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार डॉ.अविनाश सांगोलेकर होते. कवी संमेलनाच्या समारोप प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ अविनाश सांगोलेकर म्हणाले, आपली कविता आपल्याला सुखाय वाटली तरी चारचौघात सादर केली तर ती श्रोत्यांना सुखावणारी आहे की नाही हे आजमावत येते. कवी संवेदनशील असतो पण समाज संवेदनशून्य होत चालला आहे की काय..? अशा ही शंका कवींना येते आहे. महाकवी कालिदास जयंती आणि राजर्षी शाहू महाराज जयंती अशा दोन थोर विभूतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दिवशी सातपुते आप्पांनी योजलेल्या साहित्य यज्ञात मला समिधा टाकण्यासाठी निमंत्रित केलं हे माझं भाग्य समजतो. संस्थेने साहित्यिकांचे गुण हेरून त्यांचे सत्कार केलेत म्हणजे महाकवी कालिदास प्रतिष्ठान मध्ये गुणग्राहकता ठासून भरली आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. मराठीमधील पहिला प्रातिनिधिक गझलसंग्रह सुरेश भट आणि आपण १९९० मध्ये प्रकाशित केलेला अशी आठवण यानिमित्ताने त्यांनी सांगितली.

”उच्छाद मांडलेला वाचाळ कावळ्यांनी
लाथाडले अखेरी घंघाळ कावळ्यांनी”
असा मतला असलेली गझल सादर करून अध्यक्षीय मनोगताचा समारोप केला..

वि. ग. सातपुते आप्पांनी मानले उपस्थितांचे आभार –
महाकवी कालिदास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वि. ग. सातपुते ( भावकवी ) म्हणाले, महाकवी कालिदास प्रतिष्ठान देशभरातील सर्व कवी आणि लेखकांना एकत्र आणण्याचे काम सातत्याने करत असून आजपर्यंत संस्थेतर्फे आज पर्यंत ७० पुस्तके प्रकाशित केली आहेत. मी देवकार्य म्हणून ही संस्था चालवतो आहे. कार्यक्रमाचा समारोप करताना आप्पांनी “कशी कविता येते” ही रचना सादर करून उपस्थितांचे आभार मानले. यावेळी सावंतवाडीचे कवी दीपक पटेकर (दीपी) यांचा देखील कार्याध्यक्ष काकासाहेब चव्हाण यांच्या हस्ते शाल देत विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋचा कर्वे यांनी तर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन वंदना घाणेकर यांनी केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles